शिरोळ : नांदणी (ता. शिरोळ) येथील पूरग्रस्तांचे पुनर्वसन शासकीय गायरान जमिनीमध्ये करावे, अशी मागणी पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयाकडे करण्यात आली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नांदणी गावाला प्रत्येकवेळी महापुराचा फटका बसत असतो. २००५ आणि २००६ साली पंचगंगा नदीला महापूर आल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळीच ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पुनर्वसनाची मागणी केली होती; पण आजतागायत या मागणीवर विचार झालेला नाही.
२०१९ ला आलेल्या प्रलयकारी महापुरामध्ये पुन्हा ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. वेळोवेळी येणारा महापूर आणि त्यातून होणारे नुकसान आणि शासनाला करावी लागणारी कसरत यामध्ये तोडगा काढण्याची गरज आहे. नांदणीतील गट नंबर १२२ व १६९ मध्ये गायरान जमीन शिल्लक आहे. याठिकाणी महापुराचे पाणी येत नाही. त्यामुळे सर्व पूरग्रस्तांचे या गायरान जमिनीमध्ये पुनर्वसन व्हावे, यासाठी तहसीलदार यांच्याकडे निवेदनही दिले होते. तसेच कोल्हापूर येथील लोकअदालतीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हा प्रश्न मांडला होता. त्यामुळे या मागणीचा विचार करून पूरग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सरपंच संगीता तगारे, दीपक कांबळे, दिलीप परीट, इब्राहिम मोमीन, बाबासाहेब बागडी, दादासो चव्हाण, सुनील बमणगे, संजय गुरव, संजय परीट, संजय सुतार यांच्यासह पूरग्रस्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.