उचगाव : कोल्हापूर उजळाईवाडी विमानतळ विस्तारीकरणामध्ये ६४ जागेसाठी गडमूडशिंगी हद्दीतील जमीन संपादित होत असताना गडमुडशिंगी पैकी लक्ष्मीवाडी वसाहतीतील नागरिकांची राहती घरे, पाच एकर जमीन जात असल्याने येथील रहिवाशांना विस्थापित व्हावे लागणार आहे. मात्र, येथील नागरिकांनी आमचे पुनर्वसन गडमुडशिंगीतच करा, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे. प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले, विमानतळ विभागात नोकरीत प्राधान्य, रमाई आवास घरकुल योजनेतून घरे, जमिनीला पाचपट दर अशा मागण्या येथील नागरिकांनी केल्या आहेत. येथे शंभर वर्षांपासूनची मातंग वसाहत आहे. चाळीस कुटूंबे इथे राहतात. पावणे दोनशे लोकसंख्या असलेल्या या वसाहतीचा माजी सरपंच व विद्यमान ग्रा. पं. सदस्य जितेंद्र यशवंत यांनी सर्वांगीण विकास केला होता. आता वसाहत विस्थापित होत असताना येथील लोकांना विश्वासात घ्यावे, लोकांच्या न्याय व हक्कांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे यशवंत यांनी सांगितले.
या वसाहतीचे ज्येष्ठ नागरिक अशोक लहू सोनूले म्हणाले की, पिढ्यान् पिढ्या इथे खर्ची घातली. उतरत्या वयात विस्थापित होण्याची वेळ येत असून शासनाने लक्ष्मीवाडी वसाहतीतील लोकांचा विचार करून बाजार भावाच्या पाचपट रक्कम द्यावी, मुलांना नोकरीत प्राधान्य द्यावे.
कोट :
लक्ष्मीवाडी वसाहतीतल मागण्या रास्त आहे. वसाहतीतील प्रत्येक सदस्यांच्या नावे रमाई घरकूल योजनेतून घरे बांधून द्यावीत, पुनर्वसन दाखला द्यावा, लोकांच्या हितासाठी आंदोलन करण्याची वेळ अली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन ही करणार आहे.
जितेंद्र यशवंत,
माजी सरपंच व विद्यमान ग्रा. पं. सदस्य
लक्ष्मीवाडी वसाहत.
कोट : जमीन जाणार असल्याने शेतीसह पशुसंवर्धन धोक्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला प्रकल्पग्रस्ताचे दाखले द्यावेत, गावात गायरान जमिनीत स्थलांतर करता आले तर उत्तम आहे. सागर सोनूले,
अशोक सोनूले, लक्ष्मीवाडी रहिवासी
कोट :
गेली शंभर सव्वाशे वर्षांपासून येथे वस्ती आहे. विमानतळ विस्तारीकरणामध्ये घरे जाणार असल्याने योग्य ठिकाणी गावात पुनर्वसन व्हावे. पिढ्यान् पिढ्या कसलेली जमीन जात असताना शासनाने गावातच जमीन मिळवून देऊन योग्य ते पुनर्वसन करावे.
विलास सोनूले, लक्ष्मीवाडी रहिवासी
फोटो : १५ गडमुडशिंगी वसाहत
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील लक्ष्मीवाडी वसाहतमधील शेतकऱ्यांची घरे, जमिनी विमानतळ विस्तारीकरणमध्ये जाणार आहेत.