काेल्हापूर : काेल्हापूर महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या निवारा केंद्रांतून पूरग्रस्त भागातील २९० कुटुंबातील १,०२० नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. या केंद्रातून वृध्द महिला व गराेदर महिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
काेल्हापूर शहराच्या जवळपास चाळीस टक्के भागातील नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरले आहे. दाेन दिवसांपासून २९० कुटुंबांची घरे पाण्यात आहेत. अनेक दुकानेही पाण्यात सापडली आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या शहरातील हजारहून अधिक नागरिकांना महापुरातून बाहेर काढून निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. महापालिकेने जवळपास अठरा निवारा केंद्र सुरु केली आहेत. याशिवाय काही मंगल कार्यालयांतून नागरिकांची राहण्याची साेय करण्यात आली आहे.
सर्वच निवारा केंद्रांमध्ये जनरेटरची साेय, पिण्याच्या पाण्याची साेय, वैद्यकीय सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात आली आली आहे. नागरिकांची चहा, नाष्टा, जेवणाचा साेय महापालिका प्रशासनाने काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून केली आहे.
दसरा चाैकातील मुस्लिम बाेर्डींग येथे ६५ व्यक्तींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे लक्ष्मीपुरी कामगार चाळ तसेच विजापूर, रत्नागिरी येथील नागरिकांचे वास्तव्य आहे. याठिकाणी बैतुलमाल कमिटीसह काही सामाजिक संघटना पूरग्रस्तांना टुथपेस्ट, साबणापासून चहा, जेवणाची व्यवस्था करत आहेत. शिराेली येथील मदरसामध्ये जवळपास २०० नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहेे.
चित्रदुर्ग मठात सुतारवाडा, सीता काॅलनी, शाहूपुरी येथील ५० कुटुंबांतील १९० व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महापालिकेने आरोग्य पथकासह पिण्याचे पाणी, जेवणाची सोय केली आहे. मठात ३५ म्हैशी व सहा गाईंनादेखील आसरा देण्यात आला असून, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था महापालिका तसेच काही संस्थांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाने प्रत्येक निवारा केंद्रात जनरेटरसह वैद्यकीय पथकांची नेमणूक केली आहे. सर्व पूरग्रस्तांची दिवसातून दाेनवेळा तपासणी केली जात आहे.
सेंट्रल किचनची सोय व्हावी -
शहरातील निवारा केंद्रातून एकाचवेळी अनेक संस्था, व्यक्ती नाष्टा व जेवणाची सोय करत आहेत. त्यामुळे अन्नाची नासाडी हाेताना दिसत आहे. महापालिका प्रशासनाने डाॅ. विजय पाटील यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. ज्यांना पूरग्रस्तांना जेवण द्यायचे आहे, त्यांनी डाॅ. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.