आजरा :आजरा तालुक्यातील उचंगी व सर्फनाला प्रकल्पांची स्वेच्छा पुनर्वसनासह जमीन वाटप, पॅकेज वाटप, गायरान जमिनींचे प्रस्ताव, संकलन दुरुस्ती, निर्वाहक क्षेत्राचे प्रस्ताव यासह पुनर्वसनाची सर्व कामे महसूल विभागाकडून वेगाने सुरू आहेत. दोन्ही प्रकल्प मार्गी लागण्याच्यादृष्टीने काही त्रुटी असल्यास धरणग्रस्तांनी त्या दुरुस्तीच्यादृष्टीने महसूल विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केले.
उचंगी प्रकल्पामध्ये उचंगी, जेऊर, चितळे, चाफवडे या गावांतील एकूण २९८ प्रकल्पग्रस्तांचे १५४.८४ हेक्टर इतके क्षेत्र बुडित असून यापैकी २८ प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा घेतलेली आहे. यापैकी १४ प्रकल्पग्रस्तांना ८२ लाख ५० हजार रकमेचे वाटप केले असून १४ प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही.
६५ टक्के रक्कम भरलेली व पर्यायी जमीन मिळण्यास पात्र असे २२० प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना १३०.३२ हेक्टर जमीन देय आहे. यातील एकूण १३१ प्रकल्पग्रस्तांना ६८.६८ हेक्टर इतकी जमीन वाटप करण्यात आली असून ४६ प्रकल्पग्रस्तांना ८ कोटी ८० लाख इतके आर्थिक साहाय्य वाटप करण्यात आले आहे. एकूण ३ प्रकल्पग्रस्तांचे पॅकेज प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठांकडे सादर करण्यात आले आहे.
उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जेऊर येथील ४.२७ हेक्टर आणि चितळे येथील १६.८६ हेक्टर अशी एकूण २१.१३ हेक्टर जमीन वाटपास उपलब्ध करण्यासाठी मंजुरी प्राप्त झालेली आहे. २३४ लाखांचे ८१ प्रकल्पग्रस्तांना पॅकेज करारनामे कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले आहेत, तर संकलन रजिस्टर सर्वांच्या माहितीकरिता चाफवडे येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सर्फनाला प्रकल्पामध्ये एकूण २२९ प्रकल्पग्रस्तांपैकी ११ जणांनी स्वेच्छा घेतली आहे. तीनजण अपात्र झाले आहेत. १९० जणांनी ६५ टक्केप्रमाणे रक्कम भरली असून १६ जण भूमिहीन आहेत. याकरिता एकूण देय क्षेत्र १८८ हेक्टर इतके आहे. १३१ प्रकल्पग्रस्तांना १०९.६२ हे. आर. क्षेत्र वाटप केले आहे. १३२ प्रकल्पग्रस्तांना ८२.०१ हे. आर. क्षेत्र देय आहे.
चार वर्षामध्ये जमीन वाटपाचे ३६ आदेश काढून १४.९१ हे. आर. इतकी जमीन वाटप करण्यात आली आहे. देवर्डे येथील २१.५९ हे. आर. आणि पारपोली येथील ४०.५३ हे. आर. अशी एकूण ६२.१२ हे. आर. इतकी गायरान जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कलम १८ अंतर्गत वाढीव मोबदला मिळणेबाबत दाखल करण्यात आलेल्या एकूण ८० पैकी ७७ दावे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती निकालात काढण्यात आले आहेत व ही रक्कम ७ कोटी ४४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त सर्फनाला मध्यम प्रकल्पातील बुडित क्षेत्रामधील संपादित करावयाच्या जमिनीसाठी निवाड्याची कार्यवाहीदेखील सुरू असल्याचेही प्रांताधिकारी डॉ. खिलारी यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार विकास अहिर उपस्थित होते.
चालू वर्षी पाणी अडविणार नाही
उचंगी व सर्फनाला धरणाचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. धरणाचे कामही ८० टक्के झाले आहे. अजूनही धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, घळभरणीचे काम करून पाणी अडविण्याचे नियोजन चालू वर्षात नाही, असेही प्रांताधिकारी खिलारी यांनी सांगितले.