कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली.हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावाची पाहणी करुन लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समवेत आमदार सुजित मिणचेकर, गोकुळचे संचालक बाबा देसाई, पी. डी. पाटील, अजितसिंह काटकर, तहसिलदार सुधाकर भोसले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता- सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
निलेवाडी गाव 100 टक्के पूरग्रस्त असून संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. निलेवाडी गावकऱ्यांना सरकारी अथवा खासगी जागा गावकऱ्यांच्या सहकार्याने उपलब्ध करुन घेऊन त्यांना नविन ठिकाणी घरे बांधून दिली जातील, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, निलेवाडी गावात महसूल अथवा गायरान जागा शोधून त्या ठिकाणी गावाचे पुनर्वसन केले जाईल. सरकारी जागा उपलब्ध न झाल्यास खासगी जागा उपलब्ध करुन घेण्याचेही प्रयत्न केले जातील.पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळाल्याबद्दल महिलांकडून समाधानपूरग्रस्त निलेवाडी गावातील महिलांनी प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी वेळेवर केलेल्या मदतीबाबत समाधान व्यक्त केले. लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबरच त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना रोख स्वरुपाचे 5 हजार रुपयाचे अनुदान व 20 किलो धान्य तात्काळ दिल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. या परिसरातील पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी पालकमंत्री पाटील यांनी पूर कालावधीत स्वखर्चाने चारा उपलब्ध करुन देण्याची मोहीम हाती घेतली, त्याबद्दलही गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांसाठी अडीच लाख रुपये तर शहरातील घरांसाठी साडेतीन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगून, पालकमंत्री म्हणाले, पुराच्या पाण्याने पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच सध्या संपूर्ण घर पडलेल्या कुटुंबांना 1 वर्षाकरिता दर महिन्याला 2 हजार याप्रमाणे 24 हजार रुपयांचे भाडे शासनामार्फत दिले जाईल. बचत गटातील महिलांनी बँकेकडून कर्ज काढून उभ्या केलेल्या व्यवसायाचे नुकसान झाले असेल त्याचा सर्वेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.पूरग्रस्तांना रोख स्वरुपात 5 हजार रुपये आणि चार महिने 20 किलो धान्य देण्यात येत असून कोल्हापूर जिल्ह्यात आता पर्यंत 27 कोटी 47 लाख अनुदान दिल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, शासन आणि प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे जिल्ह्यातील 4 लाख 13 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना आवश्यक सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्या. टप्या-टप्याने सर्व ती मदत उपलब्ध करुन दिली जात असून पाण्याखाली गेलेल्या शेतीसाठी 1 हेक्टरची पीक कर्ज माफी आणि ज्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना उत्पन्नाच्या तिप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गोठा बांधण्यासाठी तीन हजार रुपयांची मदतही शासनाने जाहीर केली आहे.काळजी करु नका, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा दिलासा देऊन पालकमंत्री म्हणाले, पूरग्रस्तांसाठी जे-जे करावे लागेल ते निश्चितपणे केले जाईल. पुरामुळे पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच बुडालेल्या शेतीसाठीही पीक कर्ज माफ, विद्यार्थांना मोफत पुस्तके देणे, मुलींना एसटी प्रवास मोफत अशा सर्व बाबींवर शासनाने लक्ष केद्रींत केले आहे.
निलेवाडी या गावासाठी वारणा नदीवर ऐतवडे -निलेवाडी असा पुल बांधण्यासाठी तात्काळ अंजदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पुरामुळे खराब झालेल्या पूलांच्या उभारणीचे काम प्राधान्याने हाती घ्या. या प्रक्रियेसाठी तीन दिवसांचे टेंडर काढण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.भेंडवडे येथे पूरग्रस्तांसाठी मदत किटचे तसेच पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी ओल्या चाऱ्याचे वाटपही पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी खोची गावाला भेट देऊन पूरग्रस्तांच्या अडीअडचणी समजाऊन घेतल्या. पूरग्रस्तांसाठी शासन करत असलेल्या मदतीचा आणि उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.