कोल्हापूर : कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त या पदावर झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी, अशी मागणी शनिवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निदर्शनाद्वारे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात केली. मटका, जुगार, दारू यांसारख्या अवैध धंद्यांवर चाप बसविला व विशेष म्हणजे गोविंद पानसरे यांच्या खुनामध्ये संंशयित समीर गायकवाड या ‘सनातन’च्या साधक, हस्तकाला अटक करून या तपासाच्या मुळापर्यंत शर्मा चालले होते. कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली झाल्यामुळे पोलिसांचे मनाधैर्य खचणार आहे. तसेच राज्यकर्त्यांनी आपल्याला या खून प्रकरणाचा तपास लावायचा नाही, हेच पुन्हा एकदा या बदलीद्वारे सिद्ध केले आहे. त्यामुळे शर्मा यांची झालेली बदली तत्काळ रद्द करून पानसरे खून प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा केल्याशिवाय कोल्हापुरातून त्यांची बदली करू नये, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी रघुनाथ कांबळे म्हणाले, गोविंद पानसरे यांच्या खुनाचा अहोरात्र तपास शर्मा यांनी केला. यातील एक संशयित समीर गायकवाड याला शिताफिने पकडले. खुनाचा तपास लावला व सनातन संस्थेच्या साधकाला पकडले. सतीशचंद्र कांबळे म्हणाले, या खून प्रकरणाचा उलगडा करून ते मुख्य सूत्रधाराला पकडतील. या भीतीपोटीच बदली करण्यात आली. ती तत्काळ रद्द करावी. यावेळी अनिल चव्हाण, सुनीता अमृतसागर यांनीही मत व्यक्त केले. निदर्शनात बी. एल. बरगे, बाबा यादव, आशा कुकडे, प्रकाश ठाकूर, आदींचा सहभाग होता.
मनोजकुमार शर्मा यांची बदली रद्द करा
By admin | Published: December 06, 2015 1:00 AM