लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कब्जेपट्टी अथवा भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याच्या कार्यवाहीला शासनाने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील दीडशेहून अधिक प्रस्तावांना व त्यापुढील कार्यवाहीला खो बसला आहे. यामुळे चलन भरण्यापर्यंत आलेल्या प्रकरणांतील नागरिकांनी याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
भोगवटादार वर्ग २ कब्जेहक्काने आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याच्या नियम २०१९ अधिसूचनेला शासनाने १० तारखेला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती अनिश्चित काळासाठी असून, पुढील आदेशापर्यंत या आदेशाची तत्काळ अंमलजबावणी करावी, असे पत्र सहसचिव रमेश चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला पाठविले आहे. त्यानुसार निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी अशा सूचना तहसीलदार, जिल्हा निबंधक, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख अशा संबंधित विभागांना दिल्या आहेत.
नागरिकांकडून प्रस्ताव आल्यानंतर त्या जागेची कागदपत्रे, चौकशी केल्यानंतर प्रस्तावांना मंजुरी देऊन चलन भरण्याची पावती दिली जाते. याबाबतचे सर्वाधिकार प्रांताधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. ही रक्कम कधीपर्यंत भरावी, असा काही कालावधी त्यात नमूद नसतो. रक्कम कमी असेल तर नागरिक तातडीने भरतात; पण ती जास्त असेल तर बराच कालावधी जातो. ज्या नागरिकांना चलन भरण्याचे पत्र पाठविण्यात आले होते, ते पैसे भरायला गेल्यानंतर त्यांना आता रक्कम भरू नका; शासनाने या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याने काहीजणांनी जिल्हा प्रशासनाकडे याबद्दलची तक्रार केली आहे.
.....................................
रेडीरेकनरप्रमाणे दर
जमीन शेतीसाठीची असेल तर रेडीरेकनरच्या ५० टक्के आणि रहिवासी असेल तर १५ टक्के रक्कम भरून जमिनीचा वर्ग एकमध्ये समावेश केला जात होता. शासनाने १२ सप्टेंबरला रेडीरेकनरचा दर अडीच टक्क्यांनी वाढविला आहे. त्यामुळे अधिसूचनेला स्थगिती देण्यामागे दराचा काही विषय असण्याची शक्यता कमी आहे.
................................
आलेले व निकाली लागलेले प्रस्ताव
करवीर- गगनबावडा : १०० प्रकरणांची चौकशी, १० प्रकरणांना मंजुरी पण अद्याप चलन नाही, नव्याने ८ प्रस्ताव दाखल
पन्हाळा : २४ प्रस्ताव दाखल, सर्कल तहसीलदारांकडे चौकशीवर.
इचलकरंजी : ६ प्रस्ताव दाखल, ३ प्रकरणांना चलन दिले, पण अद्याप भरणा नाही.
भुदरगड : चार प्रस्ताव दाखल, एकाला मंजुरी, अन्य अर्जांची चौकशी
राधानगरी : एकही नाही.
गडहिंग्लज : माहिती मिळू शकली नाही.
----
इंदुमती गणेश