कोल्हापूर: गेली तीन दिवस संततधार कोसळलेल्या पावसाने गुरुवारी दिवसभर पूर्णपणे विश्रांती घेतली. पावसाऐवजी कडक उन्हामुळे उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली, पण संध्याकाळी साडेपाचनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडवली. नेमकी दुकाने बंद करण्याच्या वेळीच आलेल्या या पावसाने सामानाची आवरा आवर करेपर्यंत विक्रेत्यांच्या नाकी नऊ आले.पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात पावसाने तळ ठोकला आहे. मंगळवार आणि बुधवारी तर पावसाने अक्षरशा झोडपून काढले. दरम्यान बुधवारी रात्रीच चक्रीवादळ किनारपट्टीवरुन मध्यप्रदेशकडे सरकल्याने जिल्ह्यातील पावसाचा जोरही ओसरु लागला. रात्रभर अधून मधून सरी कोसळतच राहिल्या.
चक्रीवादळ पुढे सरकले तरी अजून कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पावसाचा मुक्काम कायम राहील, अशीच शक्यता होती, पण गुरुवारी सकाळी निरभ्र आकाश पाहुन सर्वानाच आश्चर्याचा धक्काही बसला आणि सुटकेचा निश्वासही सोडला.तीन दिवस पावसात काढल्यानंतर ऊन पडल्याने कांही काळ बरे वाटले पण दिवस पुढे सरकेल तसा उन्हाच्या चटक्यांनी अंगाची लाहीलाही होऊ लागली. कडक उष्म्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या. तीन दिवस गारवा अनुभवल्यानंतर हे चटके जरा जास्तच बसत होते. संध्याकाळनंतर मात्र पुन्हा ढग भरुन आले, आणि जोरदार सरी कोसळू लागल्या.
या पावसामुळे विक्रेत्यांची मात्र तारांबळ उडवली. महाद्वार रोड वर खरेदीसाठी गुरुवारी मोठी गर्दी झाली होती. त्यात पावसाळी सामानाची खरेदीसाठी विक्रेतेही मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर होते. पण अचानक आलेल्या या पावसाने त्यांची त्रेधातिरपीट उडवली.