कोल्हापूर : वयोवृद्ध आजोबांना वाचविण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करत आहोत, आमच्या तरुण मुलासाठी तातडीने इंजेक्शन हवे आहे, पण मिळत नाही. हॉस्पिटलमध्ये सांगतात नियंत्रण कक्षाने पुरवठा केलेला नाही, नियंत्रण कक्षात सांगतात आज इंजेक्शनच आले नाहीत, तर कधी सांगतात तुमच्या हॉस्पिटलला पाठवले आहे त्यांना विचारा.. समोर रुग्णाची गंभीर अवस्था असते, बाहेर आम्ही हतबल असतो अशा परिस्थितीत काय करावे, अशी उद्विग्न अवस्था रुग्णांच्या नातेवाईकांची झाली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून मागणीच्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी होत आहे. कधी-कधी तर पुरवठाच होत नाही. या औषधाचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधून दिवसाला सरासरी १५०० इंजेक्शनची मागणी नोंदविली जाते. पुरवठा मात्र फक्त ८० ते ९० इंजेक्शनचा होतो. एवढी मोठी तफावत असल्याने प्रशासनाकडे दुसरा पर्याय नाही.
इकडे आपला रुग्ण वाचविण्यासाठी नातेवाईकांची मात्र धडपड सुरू आहे. नियंत्रण कक्षाकडे फेऱ्या मारल्या जात आहेत. लोकप्रतिनिधी, पोलीस, अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात आहे. ज्यांना यापैकी काहीच शक्य नाही अशा नातेवाईकांकडे मात्र हतबलतेने वाट पाहण्याशिवाय काही राहिले नाही.
-
३१ हजारांची मागणी
रेमडेसिविरसाठी १४ तारखेपासून ३१ हजार ४०० इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ ३ हजार ३३९ इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत.
--
गेल्या चार दिवसांपासून माझे सासरे खासगी रुग्णालयात ॲडमिट असून त्यांना सहा इंजेक्शन द्यावी लागणार आहेत. हॉस्पिटलमध्ये म्हणतात की आम्हाला अतिगंभीर रुग्णांसाठीच ते वापरण्याच्या सूचना आहेत. तुम्हाला शक्य असेल तर बाहेरून उपलब्ध करून द्या, खूप फिरून आम्ही तीन इंजेक्शन मिळवू शकलो. आता उरलेल्या तीन इंजेक्शनसाठी प्रयत्न सुरू आहेत.
नातेवाईक
--
शाहूपुरीतील दवाखान्यात महिला कुटुंबीयावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यासाठी गेल्या चार दिवसांपासून आम्ही इंजेक्शनची वाट पाहतोय. नियंत्रण कक्षाने सांगितले की, आम्ही दवाखान्याला इंजेक्शन पाठवलेत पण हॉस्पिटलमध्ये सांगतात की इंजेक्शन आलेले नाहीत, खरं कुणाचं मानायचं. वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.
नातेवाईक
---
अनुभव असा येतो..
१.एक ६८ वर्षाचे गृहस्थ. नावाजलेल्या खासगी रुग्णालयात त्यांनी गुडघ्याची शस्त्रक्रिया केली. टाके काढायला गेल्यावर तिथेच त्यांना संसर्ग झाला. घरी आल्यावर ऑक्सिजन चाचणी केल्यावर ती कमी आली. एचआरटीसीचा स्कोअर २० असल्याने त्याच रुग्णालयात पुन्हा दाखल. लस घेतली होती त्यामुळे कुटुंबीयांना संसर्ग नाही.
२.उपचार सुरू परंतु डॉक्टरांनी रेमडिसिवर इंजेक्शन देण्याची सूचना. नातेवाईकांचा रविवारपासून झाला शोध सुरू.
३. मुले,जावई मिळून कोल्हापुरातील ओळखीची किमान ७ औषधे दुकाने पालथी घातली. जिल्हाधिकाऱ्यांनी नियम कडक केल्याने इंजेक्शन्स नसल्याचे उत्तर.
४. एका लोकप्रतिनिधींनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रसाद संकपाळ यांना भेटण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, रुग्णालयांकडून आम्हाला यादी येते, त्यांनाच आम्ही पुरवठा करतो. ९२ रुग्णालये आहेत. तुलनेत पुरवठा कमी होतो तुम्ही रुग्णालयाच्या पातळीवरच प्रयत्न करा.
५. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे केली विनंती परंतु त्यांनीही तुटवडा असल्याने दर्शवली असमर्थता.
६. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात जावून डॉक्टरांची घेतली भेट परंतु त्यांनी आमचीच रोजची ९० ची मागणी असताना कशीबशी ५ ते ६ इंजेक्शन्स मिळत असून ती आम्ही व्हेंटिलेटरवरील रुग्णांना देत असल्याचे सांगितले.