लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सलग दोन वर्षे मोठे नुकसान झाले असल्याने किमान यावर्षी तरी सरकारने गणेशोत्सवावरील निर्बंध शिथील करावेत. आठ दिवसांत निर्बंध उठवले नाहीत, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कुंभार समाजाने निवेदनातून दिला आहे. येथील प्रांत कार्यालयासमोर शासनाचा निषेध व्यक्त करत कुंभार समाजाने घोषणा दिल्या.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१९ साली महापूर व त्यानंतर कोरोना अशा परिस्थितीत दोन्हीही वर्षी कुंभार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी शासनाने चार फुटांच्या गणेशमूर्तीला परवानगी दिली. त्यामुळे मोठ्या मूर्ती तयार करणाऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले. परंतु, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाने नियमांचे पालन केले.
यंदा महागाईमुळे बॅँकेचे कर्ज, शिक्षण, प्रपंच याची अडचण निर्माण झाली आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. कारण त्यावर मूर्तिकार, मंडप डेकोरेटर्स, आचारी, सजावट करणारे असे विविध घटक अवलंबून असतात. सणानिमित्त होणारी उलाढालही ठप्प आहे. त्यामुळे निर्बंध शिथील करावेत; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष उत्तम कुंभार, शंकर कुंभार, बाळू कुंभार, सुभाष कुंभार, आतिश कुंभार, संजय कुंभार, सतीश कुंभार, मनोज कुंभार, बजरंग कुंभार, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
१५०७२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत कुंभार समाजाने प्रांत कार्यालयासमोर शासनाचा निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या.