कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. १0 दिवसांच्या उघडिपीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने खरीप पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३५.८५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ५२.५० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला.आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने काहीशी दडी मारली होती. गेले १0 दिवस खडखडीत ऊन पडल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. माळरानावरील भात, भुईमूग, नागली पिके ढगाकडे बघत होती; पण गुरुवारपासून वातावरणात बदल होत गेला आणि दुपारनंतर हलक्या सरी कोसळू लागल्या. गुरुवारी रात्रभर व शुक्रवारी सकाळी दहापर्यंत पावसाची रिपरिप कायम राहिली. सकाळी ११ नंतर पावसाने उघडीप दिली असली, तरी सायंकाळनंतर पुन्हा हलक्या सरी कोसळल्या.या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, कडक ऊनानंतर आता पाऊस सुरू झाल्याने तो पिकांच्या वाढीस पोषक ठरला आहे. गेले दोन दिवस पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. इतर तालुक्यांत तुरळक पाऊस झाला असून, येत्या दोन दिवसांत पावसाचा हळूहळू जोर वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’ ईशान्य अरबी समुद्राच्या वर समुद्रसपाटीपासून ५.४ किलोमीटरपर्यंत आहे. त्याच्या प्रभावामुळे कोकण व गोव्यात मोठा पाऊस होईल. येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये-हातकणंगले-३, शिरोळ-१.१४, पन्हाळा-१९.८६, शाहूवाडी-३०.१७, राधानगरी-१०.१७, गगनबावडा-५२.५०, करवीर-३.६४, कागल-३.४३, गडहिंग्लज-निरंक, भुदरगड-२०.२०, आजरा-२.७५, चंदगड-३.