कोल्हापूर : कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. माणसांबरोबरच वन्यप्राण्यांनाही या पुराचा फटका बसला होता. पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील नदीकाठी एका झाडावर सलग चार दिवस पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या सुमारे २५ ते ३० माकडांची वन्यजीव संक्रमण उपचार केंद्राच्या पथकाने सुरक्षितपणे सुटका केली.
वाघवें (ता. पन्हाळा) येथील नदीकाठी एका झाडावर गेल्या चार दिवसांपासून पुराच्या पाण्यात ही २५ ते ३० माकडे अडकली होती. अडकलेल्या दिवसापासून ती भुकेने व्याकुळ झाली होती. वाघवे येथील ग्रामस्थ दीपक पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागविली होती. वन खात्याच्या वन्यजीव संक्रमण उपचार केंद्राच्या स्वयंसेवकांनी पुराच्या पाण्यातून तब्बल साडेतीनशे फुटांचा प्रवास करून ही माकडे दोरखंडाच्या साहाय्याने वाघवे गावात सुरक्षितपणे उतरविली. त्यांना खाद्यपुरवठा केला.
मोहिमेत अनेकांचा सहभाग
या बचावकार्यात वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अक्षय कांबळे, वन्यजीव संक्रमणचे स्वयंसेवक अमित कुंभार, विकास पाटील, सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, जवान राज मोरे, सरदार कांबळे, महेश कांबळे, विनायक घुणके, कुमार पाटील, वैभव पाटील, युवराज विभुते, प्रकाश उदाळे, निखिल जाधव, विशाल सुतार, अमित कुंभार, अमोल पाडळे, पवन महाजन, रोहन पाटील, महादेव पानारी, अवधूत कुलकर्णी, संदेश पाटील तसेच वाघवे गावचे दीपक पाटील, संतोष विभुते, पोलीस पाटील गणेश पोवार, सरपंच प्रदीप पाटील, पांडुरंग पाटील, वनसेवक, विश्वनाथ पाटील, बावडा रेस्क्यू फ़ोर्सचे अक्षय निकम, नीलेश पिसाळ, दिगंबर घराळ, पन्हाळा वनपाल विजय दाते, वनरक्षक अमर माने, वन्यजीव संक्रमण उपचार केंद्र, कोल्हापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर, उपवनसंरक्षक कोल्हापूर आणि वनक्षेत्रपाल पन्हाळा, कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रसाद संकपाळ सहभागी झाले होते.
---------------------------------------------
(संदीप आडनाईक)
फोटो : 27072021-kol-Monkey Resque
फोटो ओळी : कोल्हापूर वनविभागाच्या वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राच्या स्वयंसेवकांनी वाघवे येथे पुराच्या पाण्यामुळे झाडावर अडकलेल्या माकडांची सुटका केली.