इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी शासनाने वीज दर सवलत व अनुदानाचे पॅकेज ताबडतोब जाहीर करावे, यासाठी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करावे, अशा आशयाचे निवेदन मंगळवारी यंत्रमागधारक संघटनांच्यावतीने वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांना दिले; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा यावेळी देण्यात आला.राज्यातील वस्त्रोद्योगामधील सततच्या आर्थिक मंदीमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. या उद्योगाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी शासनाने वीज दरामध्ये एक रुपयाची सवलत, तसेच प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान व विविध सुविधांचे पॅकेज जाहीर करून त्याची ताबडतोब अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी २४ नोव्हेंबरला राज्यातील यंत्रमाग केंद्रांमधून झालेल्या बंदच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.अशा पार्श्वभूमीवर आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून वस्त्रोद्योग मंत्री, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व अर्थमंत्र्यांना यंत्रमागधारकांच्या विविध संघटनांकडून मंगळवारी निवेदन देण्यात आले. त्याप्रमाणे समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे संचालक चंद्रकांत पाटील, यंत्रमाग संरक्षण समितीचे विश्वनाथ मेटे, एसबीसी विणकर संघटनेचे सुनील मेटे, भिवंडी यंत्रमागधारक संघटनेचे फैय्याज आझमी व मालेगाव यंत्रमागधारक संघटनेचे इसाक मोमीन यांनी मंत्रालयात या मंत्र्यांना प्रत्यक्ष निवेदने दिली.याबाबत वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांनी, यंत्रमागधारक संघटनांच्या निवेदनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच बैठक लावण्यात येईल,असे आश्वासन दिले असल्याचेपॉवरलूम असोसिएशनचे पाटील यांनी सांगितले.
यंत्रमागासाठी ताबडतोब पॅकेज जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:26 AM