कोल्हापूर : कोरोनामुळे अडचणीत सापडलेला बांधकाम व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असून, क्रिडाई महाराष्ट्र संघटनेने केलेल्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून राज्य सरकारने वार्षिक बाजारमूल्य दर तसेच मूल्यांकनाच्या मार्गदर्शन सूचना न बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
सन २०२० -२०२१ चे वार्षिक बाजारमूल्य तक्ते सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. त्याप्रमाणेच बाजार मूल्यांकनाचे दर कायम राहणार आहेत.
कोरोना संसर्ग आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला होता. या व्यवसायाला उभारी देण्याकरिता राज्य व केंद्र सरकारने काही सवलती दिल्या होत्या; परंतु नवीन वर्षाच्या बाजारमूल्याच्या तक्त्यात कोणताही बदल न करता ते जैसे थे ठेवावेत, अशी मागणीवजा विनंती राज्य क्रिडाईचे राज्याध्यक्ष राजीव पारीख यांनी केली होती.
राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने ही विनंती मान्य करून गेल्या वर्षाचे बाजारमू्ल्य तक्ते सन २०२१ -२०२२ या आर्थिक वर्षाकरिता कायम ठेवण्यात यावेत, असे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.