कोल्हापूर : मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती (कर्नाटक) यात्रेनिमित्त कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका मंदिरात साधेपणाने धार्मिक विधी करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली असली तरी दर्शनासह नैवेद्य दाखविण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होती.
यादिवशी सहस्त्रार्जुन राजाने जमदग्नी ऋषींची हत्या केल्याने हा दिवस विधवा पौर्णिमा म्हणून प्रचलित आहे. यानिमित्त श्रीक्षेत्र सौंदत्तीवर दरवर्षी मोठी यात्रा असते. त्यासाठी कोल्हापुरातून मानाचे चार जग व लाखो भाविक तेथे जातात. यंदा मात्र कोरोनामुळे कर्नाटक प्रशासनाने यात्रा रद्द केली असून, मानाच्या जगांनाही परवानगी दिली नाही. त्यामुळे मंगळवारी ओढ्यावरील रेणुका मंदिरात देवीचे धार्मिक विधी करण्यात आले. यंदा ओढ्यावरील अंबील यात्रा होणार नसल्याने बऱ्याच भाविकांनी भाजी-भाकरी-वडीचा नैवेद्य दाखविला. परंपरेप्रमाणे पुजारी मदन आई शांताबाई जाधव यांनी सकाळी अभिषेक घालून सालंकृत पूजा व आरती केली. त्यानंतर दुपारी पुन्हा आरती झाली. सायंकाळी देवीला पुन्हा स्नान घालून पांढरे वस्त्र नेसविण्यात आले. जग व सासनकाठीच्या आगमनानंतर आरती, कंकण विमोचन व पालखी सोहळा झाला. देवीची आरती करून पालखी मंदिराबाहेर येते तेथे उत्सवमूर्तीचा पुन्हा अभिषेक झाला. उत्सवमूर्तीला पांढरे पातळ नेसवून ओटी भरण्यात आली व कंकण विमोचन विधी झाला. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुढील महिन्याभरात भाविकांनी अंबील यात्रेचा नैवेद्य दाखवावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
----
फोटो नं २९१२२०२०-कोल-रेणुका मंदिर०१
ओळ : सौंदत्ती यात्रेनिमित्त मंगळवारी कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका मंदिरात साधेपणाने धार्मिक विधी करण्यात आले. यानिमित्त सकाळी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली.
--