कोल्हापूर : लेखक, चतुरस्र अभिनेते गिरीश कर्नाड हे ‘सूत्रधार’ चित्रपटाच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते. ३२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी ‘पाटील’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. सोमवारी त्यांच्या निधनानंतर या चित्रपटाच्या व त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. सुगुण नाट्यसंस्थेच्या १५ ते १९ तारखेदरम्यान होणाऱ्या नाट्य महोत्सवासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.गिरीश कर्नाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सूत्रधार’ या डॉ. वासुदेव देशिंगकर यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते चंद्रकांत जोशी यांनी. राजकारणावरबेतलेल्या या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर, स्मिता पाटील यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. त्यात कर्नाड यांनी ‘सरकार घराण्यातील पाटील’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी १९८५-८६ च्या दरम्यान ते कोल्हापुरात राहिले होते.
जिल्ह्यातील परिते, शिरसे, तुरंबे, सडोली या गावांत याचे चित्रीकरण झाले. त्यांची राहण्याची व्यवस्था तुळशी धरणाच्या परिसरात होती. ते प्रसिद्धीपासून जाणीवपूर्वक दूर राहायचे. चित्रीकरणाव्यतिरिक्त फावल्या वेळेत ते वाचन, कला, साहित्य, संस्कृती यांवर चर्चा करायचे, असा अनुभव चंद्रकांत जोशी यांनी सांगितला. वीरगळांवर त्यांचा विशेष अभ्यास होता.
बँकिंगतज्ज्ञ किरण कर्नाड व प्रमोद कर्नाड यांचे ते काका. प्रमोद कर्नाड यांच्या मुलाच्या लग्नासाठी ते कोल्हापुरात आले होते. मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. भास भवभूती कालिदास यांचे वाङ्मय त्यांना मुखोद्गत होते, अशा शब्दांत प्रमोद कर्नाड यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.कोल्हापुरातील सुगुण नाट्यसंस्थेने कर्नाड यांची ‘हयवदन’ (१९९७) व ‘नागमंडल’ (२०१२) ही नाटके राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर केली होती. त्यांपैकी ‘नागमंडल’ला सात पारितोषिके मिळाली होती. संस्थेच्या १५ ते १९ तारखेदरम्यान होणाऱ्या सुगुण नाट्य महोत्सवासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. यावेळी ते ‘स्ट्रक्चर आॅफ प्ले’ या विषयावर रंगकर्मींशी संवाद साधणार होते. मात्र त्यांच्या भेटीचा योग आता अधुरा राहिला, असे मनोगत दिग्दर्शक युवराज घोरपडे यांनी व्यक्त केले.आनंद यादव यांच्यासोबत मराठी साहित्यावर मराठीत चर्चासांगली जिल्ह्यातील वाळवा येथे आॅक्टोबर १९८८ मध्ये झालेल्या दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून गिरीश कर्नाड आले असता, त्यांच्याशी ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्यासोबत मेहता प्रकाशनचे अनिल मेहता यांची भेट झाली. कर्नाड आणि यादव यांनी मराठी साहित्यावर मराठीत चर्चा केल्याची आठवण अनिल मेहता यांनी सांगितली.
गुरुदत्त यांच्यावरील पुस्तकासाठी कोल्हापुरात अनिल मेहता यांचे गाठले घर
भारतीय सिनेमावर गप्पा मारताना त्यांनी गुरुदत्त आपला आवडता दिग्दर्शक असल्यासांगितले. गुरुदत्त यांच्यावरील एका दुर्मीळ पुस्तकाचे नाव घेऊन त्यांनी ते पुस्तक वाचण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुदैवाने ते पुस्तक माझ्याकडे कोल्हापूरला होते, ते देण्याची त्यांनी विनंती केल्यामुळे कार्यक्रम सायंकाळी सहानंतर संपल्यानंतर आनंद यादव यांच्यासह गिरीश कर्नाड मेहता यांच्या गाडीतून कोल्हापूरला आले. चहा घेतल्यानंतर रात्री साडेआठपर्यंत ते घरी होते. गुरुदत्तवरील दुर्मीळ पुस्तक घेऊन ते कर्नाटकात गेल्याची आठवण अनिल मेहता यांनी आवर्जून सांगितली.