लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यात २०-२१ या गळीत हंगामात गाळपास आलेल्या १५ जानेवारीपासूनची शेतकऱ्यांची थकीत सर्व ऊस बिले गुरुवारी सांयकाळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
वारणा साखर कारखान्याच्या सन २०२०-२०२१ या गळीत हंगामातील पंधरा जानेवारीपासूनची ऊस बिले थकीत होती. गाळप सुरू झाल्यापासून वारणा कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची ऊस बिले ज्या-त्यावेळी जमा केली होती; परंतु त्यानंतरची ऊस बिले देण्यास विलंब झाला होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी दि १६ जुलैपासून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी १५
जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत ऊस बिले जमा करणार, असे शिष्टमंडळास सांगितले होते. त्यानुसार वारणा कारखान्याने गुरुवारीच बँकेत शेतकऱ्यांची व वाहनधारकांचीही बिले बँकेत जमा केल्याचे भगत यांनी सांगितले.
त्यानंतर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे व शिष्टमंडळाने कारखान्याने दिलेल्या ‘शब्दा’प्रमाणे बिले बँकेत खात्यावर जमा केल्याने शेतकऱ्यांच्यावतीने वारणा कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन करून आभार मानले.
यावेळी कारखान्याचे सचिव बी. बी. दोशिंगे, स्वाभिमानी संघटनेचे संपत पवार,अजित पाटील, शिवाजी आंबेकर,आण्णा मगदूम, सुधीर मगदूम, दीपक सनदे, रावसाहेब मगदूम, अक्षय कांबळे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थकीत ऊस बिलासंदर्भात पुकारलेले आंदोलन स्थगित केल्याची प्रत शुक्रवारी वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांच्याकडे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे व संपत पवार यांनी दिली यावेळी संघटनेचे पदाधिकारी.