कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वसामान्यांसह गरजूंना गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून साडेपाच कोटी रुपयांची रेमडेसिविर इंजेक्शन्स वाटली. मात्र आता एका एका इंजेक्शनची भीक मागावी लागत आहे. आता सुध्दा जिल्हा परिषदेने ही इंजेक्शन्स उपलब्ध करून ठेवावीत, अशी मागणी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. कोविड संसर्गाबाबतच या सभेमध्ये प्रामुख्याने चर्चा झाली.
अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला काही सदस्य ऑनलाईन, तर अरुण इंगवले हे प्रत्यक्ष उपस्थित होते. इंगवले यांनीच रेमडेसिविरचा मुद्दा सभेत उपस्थित केला. सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यावेळी उपस्थित होते.
इंगवले म्हणाले, सध्या या इंजेक्शन्सची मागणी वाढली आहे. मतदारसंघातील नागरिकांचे फोन येत आहेत. मात्र त्यांना आम्ही मदत करू शकत नाही.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले की, दोन हजार इंजेक्शन्सची मागणी हाफकिनकडे करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ज्या पध्दतीने कोरोना काळात गावा-गावात काम चालले होते, तसे होताना आता दिसत नाही. याचे गंभीर परिणाम पंधरा दिवसांनंतर पाहावयास मिळतील. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. यंत्रणा मजबूत करा, असे इंगवले यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेसाठी खरेदी केलेल्या संगणकांबाबत विभागीय आयुक्तांना कळवले का? अशी विचारणाही इंगवले यांनी केली. यावेळी या भावना विभागीय आयुक्तांना कळवण्यात आल्याचे अजयकुमार माने यांनी सांगितले.
चौकट
जिल्हा परिषदेकडूनच एकत्रित खरेदीचा प्रस्ताव
जिल्हा परिषदेतील कोरोना काळातील खरेदीबाबत इंगवले आणि राजवर्धन निंबाळकर यांनी गेल्या सहा महिन्यांत प्रश्न उपस्थित केले असताना, राहुल आवाडे यांनी मात्र या सभेत, जिल्हा परिषदेकडेच एकत्रित खरेदी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे जनतेची गैरसोय होणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी, ‘अनेकांनी आरोप केले, तेव्हा तुम्ही का बोलला नाही’ अशी आवाडे यांना विचारणा केली.