कोल्हापूर : राज्यातील २८ लाख वीज थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज बिलाची ५० टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नियमित वीज बिल भरणाऱ्या दहा लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पुढच्या सहा महिन्यांत येणाऱ्या वीज बिलात पन्नास टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, राज्यात ३८ लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. त्यातील २८ लाख शेतकरी थकबाकीत आहेत. ११ हजार कोटींची ही थकबाकी आहे. त्यामध्ये पाच हजार कोटी ही केवळ मुद्दल, तर सहा हजार कोटीचा दंड, दंड व्याज आणि सरचार्ज यांचा समावेश आहे. त्यामुळे सहा हजार कोटींची रक्कम ही महावितरण माफ करणार आहे, तर राहिलेली वीज बिलाच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. त्यासाठी त्यांना हप्तेही ठरवून देण्यात आले आहेत. वीज वितरण व्यवस्थेत यावर्षी खूपच सुधारणा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आठ तास पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना वीजपुरवठा होणार आहे. काही ठिकाणी ती १६ तासही दिली जाईल. जर एखाद्या ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर जळला तर तो तीन दिवसांत दिला पाहिजे, असे आदेशच सरकारने ‘महावितरण’ला दिले आहेत, असे मंत्री पाटील म्हणाले. महावितरणच्या ‘इन्फ्रा २’ या योजनेंतर्गत राज्यात ८६०० कोटींची कामे सुरू झाली आहेत. येत्या दोन महिन्यांत ही सर्व कामे पूर्णत्वास जातील, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)
राज्यातील २८ लाख शेतकऱ्यांना दिलासा
By admin | Published: June 17, 2014 1:12 AM