कोल्हापूर : राज्य सरकारने गायदुधासाठी लिटरला पाच रुपये अनुदान दूध संघांना द्यायचे मान्य केले आहे. त्यानुसार दूध संघ शेतकऱ्यांना वाढीव दराने दूध बिल देत आहेत; परंतु सरकारने महिना होत आला तरी हे अनुदान दूध संघांना दिलेले नाही, त्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला चांगलेच फटकारले. ‘या निर्णयाबाबत फसवणूक झाल्यास याद राखा,’ असा इशारा त्यांनी फोन करून दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना दिला.नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त खासदार शेट्टी यांनी ‘लोकमत’ला भेट दिली व वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व मुख्य बातमीदार विश्र्वास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सागर शंभुशेटे, भरत आमते, स्वस्तिक पाटील, आदी उपस्थित होते.शेट्टी म्हणाले, दूध संघ दर दहा दिवसांनी शेतकऱ्यांना बिले देतात. या उद्योगात दूध संघांचे मार्जिनही कमी असते. त्यामुळे महिन्यानंतरही सरकारने त्यांना जाहीर केलेले अनुदान न दिल्यास संघांपुढील अडचणी वाढतील. त्यातून त्यांनी वाढवून दिलेले दर कमी केल्यास शेतकऱ्यांतून पुन्हा उद्रेक होईल. सरकारने त्याची वाट पाहू नये. या प्रश्नी मी स्वत: मंत्री जानकर यांच्याशी फोनवर बोललो आहे. लालफितीचा कारभार सुधारला नाही तर शिष्टमंडळ घेऊन पुढील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्र्यांनाही भेटू.शेतकऱ्याच्या प्रश्नांवर केलेल्या प्रामाणिक आंदोलनामुळे संघटनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप वगळून अन्य सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.
आम्ही संघटनेतर्फे कोल्हापूरसह हातकणंगले, सांगली, माढा, बुलडाणा आणि वर्धा या सहा जागा लढविण्याची तयारी केली आहे. दोन्ही काँग्रेसना ते स्वत: राजकीयदृष्ट्या अडचणीत असतात तेव्हा धर्मनिरपेक्ष पक्षांची आठवण येते; परंतु त्यांनी आम्हांला सोबत घेतले तर त्या प्रमाणात प्रतिनिधित्वही दिले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कॅन्सरविषयी परिषद ६ सप्टेंबरलाशिरोळ तालुक्यातील कॅन्सरच्या प्रश्नाबाबत लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी येत्या ६ सप्टेंबरला कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात परिषद घेणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. त्यामध्ये कॅन्सरतज्ज्ञांसह, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर, नाशिकच्या सह्याद्री अॅग्रोचे तज्ज्ञ, रायचूर विद्यापीठाचे डीन उपस्थित राहणार आहेत. ‘लढा कॅन्सरशी... वस्तुस्थिती, कारणे व उपाय’ असा परिषदेचा विषय आहे.