कोल्हापूर : वीजदरवाढ करून ती ग्राहकांवर लादल्यास याद राखा, असा सणसणीत इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे राज्य सरकारला दिला. सर्वांनी एकवटून सरकारला नमवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे वीज दरवाढ परिपत्रकाची होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, आ. चंद्रदीप नरके, आ. सत्यजित पाटील, संजय घाटगे, महेश सावंत उपस्थित होते.यावेळी आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सरकारने केलेली प्रस्तावित दरवाढ आम्हाला मान्य नसल्याने ती फेटाळत आहे. यासाठी आंदोलनाचे विविध मार्ग स्वीकारून सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला भाग पाडू. ९ आॅगस्टला या प्रस्तावित दरवाढीसंदर्भात सुनावणी आहे. यावेळी आपण बाजू मांडू, तरीही सरकारने दरवाढ लादली तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांची वज्रमूठ महत्त्वाची आहे. आतापर्यंत चळवळ करून ३० हजार कोटींची दरवाढ नामंजूर करून घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे दर त्याच्या हातात नाहीत म्हणून वैतागून चालणार नाही, तर यासाठी आंदोलन हा पर्याय आहे.ऊर्जामंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा इशारावीज बिल दुरुस्ती व माफी संदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे त्यांच्याविरोधात विधिमंडळ अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा दिला आहे, असे शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.