शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये असं ज्या कुणी म्हटलं आहे, त्याची प्रचीती मला दोन हजार एक साली आली.
सेवेतून सुखासमाधानाने, निर्वेधपणे निवृत्त होऊन एक वर्ष पूर्ण झालं होत. एका सायंकाळी निवांतपणे घरातल्या टीव्हीसमोर माझ्या आवडत्या जुन्या चित्रपटांच्या गाण्याचा स्वाद घेण्यात गुंगून गेलो होतो. मला जुनी काळ्या-पांढऱ्या चित्रपटातील अवीट गोडीची सुमधुर गीतं इतकी प्रिय होती की, छोट्या पडद्यावर ती पाहताना आणि ऐकताना मी रमून गेलो होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. गाणी पाहण्यात आणि डोळे भरून पाहण्यात गेलो असताना त्यात थोडादेखील व्यत्यय येऊ नये असे वाटत असताना मधेच उठून नाइलाजाने आणि थोड्याशा रागानेच दरवाजा उघडला. दारात ऑफिसचा शिपाई कोथळे उभा होता. त्याच्या हातात एक सीलबंद लखोटा दिसत होता.
‘रावसाहेब’ कोथळे बोलता झाला. “काय कोथळे, आज कशी काय वाट चुकला? काय काम काढलंत? आधी आत या. बऱ्याच दिवसांनी भेटताय. चहा घेऊ गरम गरम आणि मग निवांतपणे बोलू म्हणे.’’
‘‘रावसाहेब आता चहाचा आग्रह करू नका. अगोदरच ऑफिसमधून बाहेर पडायला वेळ झालाय. मी इकडच्या भागात रहायला आहे म्हणून आपल्याला देण्यासाठी हे टपाल माझ्या हाती दिलंय.”
कोथळेंनी पुढे केलेला लखोटा मी स्वीकारला. “टपाल मिळाल्याची काही पोचपावती हवीय काय?” मी “ काय रावसाहेब?’’ कोथळे शिपाई म्हणाला, “आपण होता तोवर आम्हाला सांभाळून घेतलं तुम्ही. तुमच्याकडनं टपाल पोचपावती तरी काय घ्यायची?”
“असं कसं? मी माझ्याकडील कोऱ्या कागदावर पोच देऊ काय?” “नको नको. सरकारी वकिलांना' सकाळी दहा वाजता म्हणजेच कोर्ट भरण्यापूर्वी भेटा असा निरोप दिलाय साहेबांनी.’’
“का रे कोथळे काही विशेष? कोर्टात हजर राहायला सांगितलंय? सरकारी वकिलांना भेटायला सांगितलंय? आणि ते देखील मला? काय समजलो नाही मी? नोकरीत असताना मी कधी कोर्टात गेलो नाही. मी कनिष्ठ कार्यालयातील क्लार्कला किंवा ओवर्सीयरला कोर्ट केसेस हाताळायच्या सूचना देत होतो मी.”
“ते माहीत आहे आम्हाला.”
“मग आता मला कशाकरिता जावं लागणार? कुणाची केस आहे?”
“मला माहीत नाही रावसाहेब. मला फक्त आपणास लखोटा पोहच करायला सांगितलं इतकंच. बरं येऊ मी? आपल्याला टपाल पोच केलं, निरोप दिला, माझं काम झालं.’’
‘‘तुझं काम झालं आणि मी कामाला लागलो.’’ हे वाक्य त्याच्या कानी पडायच्या अगोदर तो पायऱ्या उतरून पाठमोरा झाला देखील.
टीव्हीवर गाणी संपली होती. हातातल्या रिमोटने मी टीव्ही बंद केला नी लखोटा फोडून उघडला. मी सेवेत असताना कुणी लांडगे नावाच्या एका क्लार्कने नदीवर बसवायच्या खासगी इंजिनाच्या परवान्यास मंजुरी देण्यासाठी एका बागायतदारांकडून काही रक्कम लाच म्हणून स्वीकारताना स्थानिक लाचलुचपत प्रतिबंध पथकांकडून रंगेहाथ पकडला गेला होता. त्या प्रकरणी अर्थाअर्थी माझा काडीमात्र संबंध नव्हता. मात्र प्रकरण घडले तेव्हा मी कार्यालयीन अधीक्षक म्हणून सेवेत होतो. खरं तर या प्रकरणी माझ्यानंतर अधीक्षक म्हणून आलेली व्यक्ती कोर्टात हजर राहून साक्ष देऊ शकली असती. परंतु काही जणांनी खोडसाळपणाने व माझी फजिती कशी होते. कोर्टात कशी भंबेरी उडते हे पाहण्याची मजा अनुभवण्यासाठी माझ्या नावे कोर्टाचे समन्स काढायला लावले होते.
पत्र वाचून बाजूला ठेवले खरे, परंतु रात्री जेवताना व अंथरुणावर पाठ टेकल्यावरदेखील डोळ्याला डोळा लागेना. या षडयंत्रामागे कोण असावे हा विचार प्रथमतः मनात आला. मी प्रशासकीय अधिकारी म्हणून अनुभवी, माहीतगार या बरोबरच कडक शिस्तीचा म्हणून लौकिकास पात्र ठरलो होतो. शासकीय कामात दिरंगाई, विलंब झालेला मला खपत नसे. त्यामुळे कामचुकार, निष्काळजी कर्मचाऱ्यांच्या रोषास पडद्यामागे मी पात्र ठरलो होतो. असे काही नं मी आठवू लागलो. मात्र, या पाताळयंत्री कारस्थानाला आणि मला यात विनाकारण अडकवून माझी फजिती पाहण्यास आणि कोर्टातील प्रश्नाेत्तरात मी कुठे सापडून माई तुटपुंजा पेन्शनला बाधा आणण्यासाठी टपलेले लोक मला नेमके कोण? ते आठवता आठवेनात. मात्र, जो-जो प्रकार घडला, तो-तो माझ्या डोळ्यासमोर आला.
मुळात तो लांडगे का कुणी क्लार्क होता, हो मी कार्यरत असलेल्या कार्यालयात नव्हता. तर आमच्या कनिष्ठ कार्यालयात कामाला होता. ते कार्यालय आमच्या कार्यालयाच्या भिंतीला लागून पलीकडे होते. तिथले मुख्य अधिकारी त्यांचे स्वीय सहाय्यक अधिकारी व इतर पन्नास-साठ कर्मचाऱ्यांचा समूह स्वतंत्रपणे त्यांच्या त्यांच्या अधिकार प्रणालीत कार्यरत होते. फरक एवढाच होता, तो म्हणजे वरिष्ठ कार्यालय या नात्याने मी कार्यरत असलेल्या साहेबांचा प्रशासकीय अधिकारी होता. त्यांच्या अधिकारात नसलेल्या सर्व प्रकरणांमध्ये आमच्या साहेबांचे नियमांनुसार मार्गदर्शन, मंजुरी दिली जात असे.