कोल्हापूर : उन्हाळा आल्यामुळे प्राण्यांसाठी घराबाहेर, टेरेसवर पाणी ठेवा अशाप्रकारची मोहिम प्राणीप्रेमी संस्थांकडून राबविली जात असतानाच कोल्हापूरातील एका सोसायटीने प्राण्यांची तहान भागवणाऱ्या प्राणीप्रेमी आजरी कुटूंबाला त्यांनी घराबाहेर बांधलेला पाण्याचा हौद काढून टाकण्याची नोटीस पाठविली आहे. या हौदावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांमुळे अस्वच्छता वाढलेली असून कोरोनाचेही कारण या लेखी नोटीसीत दिली आहे. दरम्यान, ही माहीती आजरी कुटूंबांनी सोशल मिडियावर व्हायरल केली असून त्यांना प्राणीमित्रांकडून पाठिंबा मिळत आहे.मूळचे गडहिंग्लज येथील बसवराज आजरी कुटूंबिय गेली २५ वर्षे कोल्हापूरात वास्तव्य करुन आहेत. राजारामपुरी येथील गोविंदराव कोरगांवकर कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या प्लॉट क्रमांक ३२ वर घर बांधताना त्यांनी महानगरपालिकेच्या हद्दीतील आपल्या घराबाहेर कुत्र्यांसाठी छोटा आणि म्हैशींसाठी मोठा असे दोन पाण्याचे हौद बांधले होते, यातील पाणी ते रोज बदलतात. त्यामुळे येता जाता कित्येक गायी, म्हैशी आणि भटकी जनावरे इथे पाणी पिऊन आपली तहान भागवतात.प्राण्यांचा वावर वाढला तर अस्वच्छता होऊन यामुळे कोरोना पसरेल असे कारण देऊन सोसायटीने आजरी यांना हे हौद सात दिवसांत हटविण्याची नोटीस दिली आहे. न काढल्यास हा हौद स्वखर्चाने काढण्यात येईल असा इशाराही दिला आहे. या सोसायटीत ५२ प्लॉटधारक असून यातील निम्म्याहून अधिक प्लॉटधारकांनी हौद हटविण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.याप्रकरणी सोसायटीने २६ सप्टेंबर २०१८ रोजीही आजरी यांना पूर्वसूचना दिली आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन बाबा जगताप यांनी दिली आहे. याप्रकरणी आयुक्त आणि पोलिसांना कळविण्यात येणार असल्याचे सचिव सुरेश पाटील (कणेरीकर सरकार) आणि संचालक मानसिंग चव्हाण यांनी सांगितले आहे.दरम्यान, काही लोकांच्या हट्टीपणामुळे मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा हौद तोडण्यासाठी सोसायटीने नोटीस बजावली आहे. याला गडहिंग्लज फेसबुक ग्रुपचे प्रशांत बाटे यांनी विरोध केला असून निषेध केला आहे. आजरा येथील प्राणिमित्र अमित प्रभा वसंत यांनीही तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून एकीकडे मुक्या जनावरांना, पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करा, असे आवाहन केले जात असतानाच एखाद्याचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याचा प्रकार निंदनीय असल्याचे अमित प्रभा वसंत यांनी म्हटले आहे.
जनावरांची तहान भागविणारा हौद हटवा, प्राणीप्रेमी कुटूंबाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 9:52 PM
wildlife kolhapur- उन्हाळा आल्यामुळे प्राण्यांसाठी घराबाहेर, टेरेसवर पाणी ठेवा अशाप्रकारची मोहिम प्राणीप्रेमी संस्थांकडून राबविली जात असतानाच कोल्हापूरातील एका सोसायटीने प्राण्यांची तहान भागवणाऱ्या प्राणीप्रेमी आजरी कुटूंबाला त्यांनी घराबाहेर बांधलेला पाण्याचा हौद काढून टाकण्याची नोटीस पाठविली आहे. या हौदावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांमुळे अस्वच्छता वाढलेली असून कोरोनाचेही कारण या लेखी नोटीसीत दिली आहे. दरम्यान, ही माहीती आजरी कुटूंबांनी सोशल मिडियावर व्हायरल केली असून त्यांना प्राणीमित्रांकडून पाठिंबा मिळत आहे.
ठळक मुद्देजनावरांची तहान भागविणारा हौद हटवा, प्राणीप्रेमी कुटूंबाला नोटीस प्राण्यांमुळे अस्वच्छता होत असल्याचे सोसायटीचे म्हणणे