इचलकरंजी : शिरढोण (ता. शिरोळ) येथे अनेक ठिकाणी कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. ते पाणी तेथील शेतामध्ये जात असल्याने मशागतीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे गळती काढावी; अन्यथा २३ जुलैला रास्ता रोको करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदनाद्वारे दिला.
शिरढोण येथे कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला गेल्या वर्षांपासून तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. याबाबत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ठेकेदाराने भागातील गळती काढून माती रस्त्यावर टाकली आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल पसरला असून, मोटारसायकलींचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. याकडे गांभीर्याने पाहावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जलअभियंता अंकिता मोहिते उपस्थित होत्या. शिष्टमंडळात विश्वास बालिघाटे, संजय मोरडे, धर्मेंद्र लवटे यांच्यासह शेतकऱ्यांचा समावेश होता.
फोटो ओळी
१६०७२०२१-आयसीएच-०२
कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले.