कोल्हापूर : ऐतिहासिक पन्हाळगडावरील सर्व अतिक्रमण हटविण्यात यावीत, गडाचे हेरिटेज लूक कायम ठेवा, इमारतींमध्ये एकसंघता असावी, स्वच्छता राखा लोकसहभागातून गडाचे जतन संवर्धन करा, पार्किंगची सोय करा अशा सूचना केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिल्या आहेत. या सूचनांनुसार पन्हाळ्यावर सुधारणा व अतिक्रमणांवर कडक कारवाई केली जाईल त्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी दिली.जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी युनेस्कोची टीम ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत येणार आहे. त्यांच्या निकषानुसार पन्हाळगडावर सुधारणा करणे गरजेचे असून, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त महानिदेशक जानवीज शर्मा, अधीक्षण पुरातत्व विदच्या डॉ. शुभा मुजुमदार यांनी पन्हाळगडाची पाहणी केली.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राज्य पुरातत्व खात्याचे सहसंचालक विलास वहाने, उत्तम कांबळे, पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतन माळी यांच्यासह आर्किटेक्ट व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पन्हाळगडाचा युनेस्कोच्या यादीत समावेश हाेण्याच्या दृष्टीने कोणकोणती महत्त्वाची पावले उचलले जाणे गरजेचे याबाबत केंद्रीय पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये युनेस्कोची टीम गडावर येण्याआधी या सर्व उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी माझ्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पुरातत्त्वच्या निकषांनुसार गडावर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल व प्रत्यक्ष झालेल्या कामांचा दर आठवड्याला आढावा घेतला जाईल.
Kolhapur: पन्हाळ्यावरील अतिक्रमणे हटवा, हेरिटेज लूक जपा; केंद्रीय पुरातत्व विभागाची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 3:32 PM