कोल्हापूर : छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राबाबत वारंवार अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य शासनाने १५ दिवसांत राज्यपालपदावरून हटवावे. अन्यथा मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया ते राजभवनपर्यंत ‘कोल्हापुरी चप्पल मार्च’ काढण्यात येईल, असा इशारा आज, सोमवारी कोल्हापुरातील शिवभक्त लोकआंदोलन समितीने दिला. शिवराय, महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही. स्वाभिमान जपण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार समितीने केला असल्याची माहिती निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी दिली.येथील शाहू स्मारक भवनात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध व त्यांना पदावरून हटविण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता समितीतर्फे ‘कोल्हापुरी पायताण मार’ सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले होते.छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत. त्यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रकार वारंवार राज्यपाल कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, पंकज चतुर्वेदी यांच्याकडून सुरू आहे. त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लंगडे समर्थन करू नये, अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मुळीक यांनी दिला.शिवराय, महाराष्ट्राचा अवमान होताना सत्ताधारी गप्प, तर ईडीला घाबरून विरोधकही शांत आहे. मात्र, कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटविण्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल. या सभेत गुलाबराव घोरपडे, रघुनाथ कांबळे, शैलजा भोसले, बाजीराव नाईक, पंडित पोवार, जहाँगीर अत्तार, बाळासाहेब मोमीन, रणजित पवार, सुशीलकुमार कोल्हटकर, रफिक शेख, अंजली जाधव, दगडू भास्कर, अशोक भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर दिलीप सावंत यांनी कवनातून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला.
राज्यपाल कोश्यारींना १५ दिवसांत हटवा, अन्यथा राजभवनावर ‘कोल्हापुरी चप्पल मार्च’
By संतोष.मिठारी | Updated: November 28, 2022 18:06 IST