कोल्हापूर : पुण्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, असुविधा यांबाबत अनेक तक्रारी आहेत. ‘लोकमत’ने मालिकेच्या माध्यमातून या सर्व गैरसोयींचा, टोलच्या जादा रकमेचा आणि दर्जाचा ऊहापोह केला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी जनता दलाचे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी केली आहे.
परुळेकर यांनी मंगळवारी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झालेल्या मालिकेची कात्रणे घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे अधीक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे यांची पुण्यात भेट घेतली. वास्तविक, वाहनांची नोंदणी करतानाच जो रस्ता कर घेतला जातो त्याचवेळी नागरिकांना दर्जेदार रस्ते देण्याची शासनाची जबाबदारी ठरते. यानंतर पुन्हा नागरिकांना टोल द्यावा लागतो. तरीही वेळ, इंधन, पैसा आणि प्रदूषण या सर्वच बाबतीत नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो.
याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या तरी या तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते. सर्वांत गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील रस्त्यांच्या दर्जामध्ये जो फरक आहे तो आम्हा नागरिकांना नेहमी जाणवतो. परंतु, याबाबत कुणीही जाहीर बोलत नव्हते. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणली की, महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर केवळ दोन कोटी रुपये मिळाले तर कर्नाटकमधील रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर चार कोटी रुपये मिळाले. महाराष्ट्राबाबत हा भेदभाव का, असा सवाल शिवाजीराव परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.या रस्त्याच्या कामांबाबत एक जागरूक नागरिकांची समिती नेमावी आणि या सर्व सुधारणांचा कृती आराखडा विहित वेळेत जाहीर करावा, अशीही मागणी परुळेकर यांनी केली आहे.राष्ट्रीय महामार्गाचे चित्रीकरण करणारयावेळी चर्चेमध्ये नागरगोजे यांनी महामार्गाच्या मध्यभागी चांगली झाडे लावली आहेत. खड्डे नाहीत असेही सांगितले. परुळेकर यांनी कोल्हापूरला येताना मध्ये थांबून पाहणी केली आहे. आपण पुन्हा पुण्याला जाताना कुठे खड्डे आहेत, कुठे झाडे आहेत, नाहीत याचे चित्रीकरणच करून घेऊन जाणार असल्याचे सांगितले.