कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाला मागील दोन वर्षे गळती सुरू असून, सध्या प्रतिसेकंद २७७ लिटर इतके पाणी वाया जात आहे. गळती थांबवण्यासाठी यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ऐन उन्हाळ्यात याचा संपूर्ण जिल्ह्यावर ताण पडू शकतो, त्यामुळे सरकारने ही गळती थांबवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपण मांडलेला विषय गंभीर आहे, गळती असेल तर ती तपासावी लागेल, जलसंपदा विभागाला याबाबत निर्देश देऊ, अशी ग्वाही दिली.जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील धरणाला माेठ्या प्रमाणात गळती लागली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ, भुदरगडमधील १२१ गावांमधील ४६ हजार हेक्टर क्षेत्राला याच धरणातून पाणीपुरवठा होतो. शिवाय कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पिण्यासाठी पाणी दिले जाते. या धरणाची २५.३९ टीमएसी इतकी क्षमता आहे.मात्र, गेल्या काही वर्षांपासून या धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी राज्य सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया झाली नसल्याने पुढील काम थांबले आहे. ही गळती वाढल्याने आमदार पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नुकतेच बिद्री कारखाना व गोकुळचे संचालक आर. के. मोरे यांनी दुधगंगा काठावरील सरपंचांना घेऊन पाटबंधारे विभागास गळती काढण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते.
Kolhapur: काळम्मावाडीची गळती तातडीने काढा, सतेज पाटील यांची अधिवेशनात मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:09 IST