कोल्हापूर : राज्यातील दोन हिंदकेसरी आणि पाच विधवा पत्नी आणि ३० हून अधिक महाराष्ट्र केसरी ज्येष्ठ मल्लांचे पाच महिने मानधन रखडले होते. याबाबत राज्याच्या क्रीडा कार्यालयाने अशा ज्येष्ठ मल्लांच्या मानधनाबाबतची कार्यवाही केली असून, ते लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी ‘लोकमत’ला दिली.राज्यातील दोन हिंदकेसरी आणि पाच विधवा पत्नी आणि ३० हून अधिक महाराष्ट्र केसरी ज्येष्ठ मल्लांना मानधन दिले जाते. एक ते सात तारखेपर्यंत हे मानधन जमा व्हावे, अशी इच्छा या ज्येष्ठ मल्लांची असते. प्रत्येक वेळेला कधी पाच महिने, तर कधी आठ महिने असे मानधन रखडले जाते. हिंदकेसरींसह महाराष्ट्र केसरींना सहा हजार रुपये मानधन राज्य सरकार देते; मात्र त्यात नियमितता नाही. त्यामुळे उदरनिर्वाह आणि औषधोपचारांचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न मल्लांना पडला होता.
याबाबत लोकमतमधून वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल राज्याच्या क्रीडा खात्याने घेतली. याबाबतची कार्यवाही त्वरित करण्यात आली. त्यामुळे पाच महिन्यांचे मानधन लवकरच या ज्येष्ठ मल्लांच्या खात्यावर जमा होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ मल्लांच्या विधवा पत्नींच्याही मानधनाबाबत लवकरच कार्यवाही होणार असून, तेही लवकर जमा होणार आहे.
हिंदकेसरींसह सर्वच ज्येष्ठ मल्लांचे रखडलेल्या मानधनाबाबतचे प्रस्ताव निर्गत करण्याचे आदेश ज्या त्या जिल्ह्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच ते ज्येष्ठ मल्लांच्या खात्यावर जमा होईल. - डाॅ, सुहास दिवसे, क्रीडा आयुक्त, महाराष्ट्र राज्य