कोल्हापूर : गेले महिनाभर चर्चेच्या फेऱ्यात अडकलेली घरफाळा तसेच पाणीपट्टी दरवाढ अखेर शुक्रवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आली. शहरवासीयांची घरफाळ्यात आधीच काही अधिकाऱ्यांनी फसवणूक केली असून आता पुन्हा ती होऊ देणार नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतल्यामुळे प्रशासनाचा नाईलाज झाला. सध्या सुरू असलेल्या मिळकती सर्वेक्षणात ‘सेटलमेंट’ होत असल्याचा गंभीर आरोप झाल्याने प्रशासनाची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रे आवर’ अशी झाली. घरफाळा व पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. घरफाळा व पाणीपट्टीची वसुली वाढावी म्हणून ‘निर्भय योजना’ लागू करण्याची मागणी आयुक्तांनी नाकारल्यामुळे दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा न करताच ते नामंजूर करण्याचा निर्णय सभागृहात झाला. यावेळी गटनेते शारंगधर देशमुख यांनी ‘निर्भय योजना’ लागू करण्यास नकार देणाऱ्या प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. प्रा. जयंत पाटील यांनीही प्रशासन लोकप्रतिनिधींशी असहकार्य करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.‘सेटलमेंट’चा आरोपदरम्यान, राहुल चव्हाण यांनी सध्या सुरू असलेल्या मिळकती सर्वेक्षणात ‘सेटलमेंट’होत असल्याचा गंभीर आरोप करून सभागृहात गदारोळ उडवून दिला. कूळ वापर असताना मालक वापर होत असल्याचे, तसेच क्षेत्र कमी दाखविण्यासाठी चार-चार हजार रुपये मागितले जात असल्याचे चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. एवढेच नाही, तर ज्या मिळकतधारकांकडे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले त्यांच्याशी फोनवर ‘स्पीकर आॅन’ करून माहिती घेतली. कूळ वापर असताना मालक वापर दाखवितो म्हणून चार हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, पण दोन हजार रुपये दिल्याचे पलीकडील व्यक्तीने फोनवर सांगताच अनेक सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. यावेळी राहुल चव्हाण, भूपाल शेटे, मुरलीधर जाधव, सत्यजित कदम, नियाज खान यांनी सर्वेक्षणाचा ठेका तातडीने रद्द करण्याची मागणी लावून धरली. ठेकेदाराची मुदत संपत आली आहे तरी केवळ पंधरा हजार मिळकतींचे काम पूर्ण केले आहे, तरीही पन्नास लाखांचे बिल अदा केल्याचे भूपाल शेटे यांनी सांगताच सभागृहातील गोंधळ अधिकच वाढला.‘सायबरटेक’ सर्वेक्षकांवर गुन्हा दाखलचे आदेशकोल्हापूर : शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा ठेका घेतलेल्या सायबरटेक सिस्टीम कंपनीच्या सर्वेक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. तसेच या कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करून महापालिकेकडील डिपॉझिट जप्त का करू नये, याबाबतची नोटीसही कंपनीला पाठविण्याचा आदेश दिला. महानगरपालिका सभेत कंपनीचे सर्वेक्षक पैसे घेऊन सेटलमेंट करीत असल्याचा आरोप नगरसेवक राहुल चव्हाण यांनी केल्यानंतर सायंकाळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, घरफाळा विभागप्रमुख दिवाकर कारंडे, नगरसेवक राहुल चव्हाण यांनी श्रीनिवास हाईटस् येथील श्रीनिवास कुमठेकर-छाया कुलकर्णी यांच्या मालकीच्या मिळकतीमधील कूळ निंबाळकर यांच्याकडे जाऊन चौकशी केली. त्यावेळी कंपनीचे सर्वेक्षक अश्विन मोरे, सैफ शेख व आकाश सातपुते यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली होती, तशी तक्रार कूळ निंबाळकर यांनी केली. कुमठेकर यांच्या मिळकतीचे क्षेत्र ५८१ चौरस फूट इतकी दाखविली आहे. सदर क्षेत्रफळ असेसमेंट रेकॉर्डवरील क्षेत्रफळापेक्षा कमी दिसते. त्यामुळे या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले.
घरफाळा, पाणीपट्टी वाढ नामंजूर
By admin | Published: March 25, 2017 12:01 AM