कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या ७५ चौरस फुटांपासून ते ५०० चौरस फुटांपर्यंतच्या खुल्या जागा भाडेतत्त्वावर कराराने देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून २० आॅगस्टला होणाऱ्या मासिक सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील आठ विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या काही खुल्या जागा शहरात पडून आहेत. त्या भाड्याने देण्याचा प्रस्ताव इस्टेट विभागाने तयार करून तो महासभेच्या मान्यतेसाठी दिला आहे. ‘डी’ वॉर्ड गवत मंडई येथील ५०० चौ. फूट, आयसोलेशन येथील ५०० चौ. फूट, फुलेवाडी फायर स्टेशनजवळील ७३.९९ चौ. फुटांच्या दोन, तर १५९ चौ. फुटाची एक जागा, आरटीओ आॅफिससमोरील जागा, लाईन बझार येथील खुली जागा, कसबा बावडा महाराष्ट्र हायस्कूल येथील जागा यांचा त्यामध्ये समावेश आहे. या जागा भाड्याने देण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाने रितसर निविदा काढून देकार मागविले होते. विशेष म्हणजे इस्टेट विभागाने रेडिरेकनरप्रमाणे अपेक्षित धरलेल्या किमान भाड्यापेक्षा कितीतरी पटीने देकार आले आहेत. या जागा दहा वर्षांच्या कराराने देण्यात येणार आहेत. या संदर्भातील सर्व निविदा प्रक्रिया राबवून अंतिम मंजुरीसाठी महासभेसमोर प्रस्ताव आणण्यात आला आहे. के.एम.सी. कॉलेज प्राध्यापक नियुक्तीवर होणार निर्णय महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडील पी. डी. तोरस्कर, एच. डी. पाटील, पी. एस. कांबळे या तीन अर्धवेळ प्राध्यापकांना पूर्णवेळ नियुक्ती देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेसमोर आणला गेला आहे. या तीन प्राध्यापकांनी पूर्णवेळ नियुक्तीसाठी आमरण उपोषण केले होते.
महापालिकेच्या जागा भाड्याने देणार
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM