कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षातील चार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळावी म्हणून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविलेल्या प्रस्तावांची चौकशी करून त्याचे फेरनियोजन करावे, अशी मागणी नगरसेविका मेहजबीन सुभेदार यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे मंगळवारी लेखी निवेदनाद्वारे केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. ६ जानेवारी २०१६ रोजीच्या पत्रानुसार कोल्हापूर महानगरपालिकेस या योजनेसाठी सादर केलेल्या प्रस्तावासोबत ठराव जोडलेला नाही, तांत्रिक प्रमाणपत्र मूळ स्वाक्षरीसह सादर करण्यात यावे. तसेच हा प्रस्ताव आवश्यक त्या अंदाजपत्रकासह सादर करण्यात यावा, असे कळविले आहे. परंतु हे पत्र मिळाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने नवीन कौन्सिल ठराव केलेला नाही. दि. १० सप्टेंबर २०१४ व २४ सप्टेंबर २०१४ रोजीचे म्हणजे जुनेच ठराव प्रस्तावासोबत जोडलेले आहेत. त्यामुळे नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील कामे या योजनेत सुचविण्यात आलेली नाहीत, असे सुभेदार यांनी निवेदनात म्हटले आहे. या योजनेतून नगरसेवकांना प्रभागातील गटर्स, रस्ते, चॅनेल बांधणे, एलईडी दिवे बसविणे, क्रीडांगणाचा विकास करणे, समाजमंदिर बांधणे, महिलांसाठी शौचालये बांधणे, ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र, अशी विविध कामे करता येणार आहेत; परंतु सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात करायची कामे नव्याने सुचविणे आवश्यक असताना जुनीच कामे घेणे हे विद्यमान नगरसेवकांवर अन्याय करण्यासारखे आहे म्हणूनच जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचे फेर नियोजन करावे, असेही नगरसेविका सुभेदार यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
नगरोत्थान योजनेतील कामांचे फेरनियोजन करावे
By admin | Published: March 02, 2016 12:44 AM