आजरा : आजऱ्यातील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे. उन्हाळ्यात उष्णतेचा तर, पावसाळ्यात गळतीचा तडाका यामुळे पोलिसांनी आपल्या कुटुंबीयांसह कसे रहायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने वसाहतीची डागडुजी तर नगरपंचायतीने परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने कारवाई करावी; अन्यथा शंखध्वनी आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी रात्रंदिवस समाजासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या वसाहतीच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी प्रशासनाची आहे. आजपर्यंत बांधकाम विभागाने पोलीस वसाहतीकडे लक्ष न दिल्यामुळे खोल्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्याला तीन आमदार असतानाही पोलीस वसाहतीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पोलीस वसाहतीची डागडुजी व आजरा नगरपंचायतीने वसाहतीच्या परिसराची स्वच्छता करावी, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर शंखध्वनी आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे, उपतालुका अध्यक्ष आनंदा घंटे, महिला आघाडीप्रमुख सरिता सावंत, उपतालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे, शहराध्यक्ष कुणाल पोतदार, चंद्रकांत सांबरेकर, वसंत घाटगे, पूनम भादवणकर, म्हंकाळी चौगुले, प्रथमेश सुकवे, आकाश हसबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.