कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांचे तातडीने पॅचवर्क करण्याचे आदेश बुधवारी महापौर हसिना फरास यांनी महापालिका अधिकाºयांना दिले; परंतु निधी उपलब्ध नसल्याची तसेच कामगार नसल्याची कारणे अधिकाºयांनी सांगताच ‘काहीही करा; पण लोक आमच्या दारात येण्यापूर्वी कामे सुरू करा,’ असा आदेशच महापौरांनी दिला.
बुधवारी महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निधी उपलब्ध नसल्याची कबुली अधिकाºयांनी पदाधिकाºयांसमोर दिली; तर यावर्षीच्या बजेटमधील तर कामे झालीच पाहिजेत; शिवाय गतवर्षी बजेटमध्ये धरण्यात आलेली कामेही तत्काळ सुरू झाली पाहिजेत, असा आग्रह पदाधिकाºयांनी धरला.
यावेळी महापौर फरास यांनी दायित्व कालावधीमध्ये खराब झालेले सर्व रस्ते संबंधित ठेकेदाराकडून पूर्ववत दुरुस्त करून घ्यावेत; तसेच खड्डे तत्काळ पॅचवर्क करून बुजवावेत, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या. शहरातील खड्ड्यांसंदर्भात पाहणी करण्यात आली होती, हे खड्डे तातडीने पॅचवर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रशासनाकडून पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करू, असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही रस्ते पॅचवर्कच्या कामास सुरुवात नाही, पॅचवर्क करण्यासाठी एस्टिमेट तयार करण्यात आले आहे का, मागच्या वर्र्षीची कामे अजून का पूर्ण झालेली नाहीत? असे प्रश्न प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, सभागृह नेता प्रवीण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, सुनील पाटील यांनी उपस्थित केले.
प्रशासनाकडे अपुरे मनुष्यबळ असल्यास ठेकेदारामार्फत पॅचवर्कर्ची कामे करून घ्या. तसेच इतर विभागांत काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी पूर्ववत घेवून पॅचवर्कर्ची कामे पूर्ण करा, ठेकेदारांकडून जुनी कामे प्रथम पूर्ण करूनच नवीन कामांचा ठेका द्या, अशा सूचना उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी केल्या.शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी यावेळी बोलताना एक वर्ष व तीन वर्षे वॉरंटीमध्ये असणारे रस्त्यांचे पॅचवर्क करण्याच्या कामास लवकरच सुरुवात केली जाईल. तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. अतिवृष्टीनंतर खराब झालेल्या रस्त्यांसाठी ५० लाख रुपयांची आवश्यकता असून, त्यांची उपलब्धता झाली तर तीही कामे सुरू केली जातील, असे त्यांनी सांगितले.
मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी पॅचवर्कसाठी अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक प्रभागासाठी अडीच लाख रुपये तसेच साडेतीन कोटींच्या कामांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले.यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, नगरसेवक श्रावण फडतारे, मोहन सालपे, नगरसेविका माधुरी लाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, आर. के. जाधव, आदी उपस्थित होते.गतवर्षीची कामेही अपूर्णचगतवर्षी रस्ते पॅचवर्क तसेच प्रभागातील रस्ते करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला अडीच लाख रुपयांची निधी मंजूर केला होता; परंतु त्यातील एकही रुपया उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यात सर्व रस्ते खराब झाले आहेत. तातडीने दुरुस्त केले नाहीत तर लोक आमच्या दारात येतील. त्यामुळे तुम्ही काहीही करा; पण कामे सुरू करा, असा आग्रह पदाधिकाºयांनी केला.