समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्रातील विचाराचे सरकार राज्यात आणण्याची कामगिरी हरयाणाने तिसऱ्यांदा करून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृती करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शेंडा पार्क येथील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय नगरीमध्ये नव्या रूग्णालयांच्या इमारत भूमीपूजनानंतर ते तपोवन मैदानावर झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच नुतन वास्तूंचे ऑनलाईन पध्दतीने लोकार्पण करण्यात आले.
पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी, दलित, वंचित, महिला, युवक, युवती यांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक योजना राबविण्याचा निर्णय घेतला. लाडकी बहिण, तीन गॅस सिलिंडर मोफत, मुलगी जन्माला आली तर १ लाखाची ठेव, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षाण्, शेतकऱ्यांना वीज बील माफ, गायीच्या दुधाला सात रूपयांचे अनुदान या योजना जर पुढे सुरू रहायच्या असतील तर महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले पाहिजे. चुकीचे सरकार निवडून देवू नका नाहीतर या सामान्यांच्या फायद्याच्या योजना बंद झाल्याशिवाय राहणार नाहीत.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मी वैद्यकीय शिक्षण मंत्री कार्यभार हाती घेतल्यानंतर १२ नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभी रहात आहेत. एमबीबीएस विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता १ हजारांनी वाढली, राज्यात ४ हजार ३०० खाटा वाढल्या. या विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करण्यात आले.