लोकमत न्युज नेटवर्क
शिरगाव : शिरगाव (ता. राधानगरी) येथे मंजूर नवीन ग्रामसचिवालयाच्या बांधकामाची जागा बदलून, सर्व सोयींयुक्त अशा ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. शंकर कलिकते, ग्रा. पं. चे माजी सदस्य सुकुमार शिरगावकर, प्रशांत पाटील, आर. एम. पाटील, बाजीराव पाटील यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार प्रकाशराव आबिटकर, जिप सदस्य पांडुरंग भांदीगरे, जिल्हा ग्रामीण निधी योजना अंतर्गत कर्ज रूपाने फंड व पंधराव्या वित्त आयोगाचा फंड असे मिळून अंदाजे ६० लाख रुपये निधी गोळा केला आहे. मात्र ग्रा.पं. कमिटीने ग्रामस्थांना विश्वासात न घेता व कोणतीही पूर्वकल्पना न देता जुनी इमारत पाडण्याची प्रक्रिया केली. तसेच नवीन ग्रामसचिवालयाच्या इमारतीच्या बांधकामास देखील सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने कोणतेही वाहन ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाऊ शकत नाही. तसेच जुन्या इमारतीच्या जागेवरच नवीन इमारत बांधण्याचा घाट घातल्याने वाहतूक खर्च हा इमारतीच्या बांधकामांच्या मजुरीपेक्षा जास्त होणार आहे. परिणामी ग्रामस्थांसह शासनाचे देखील आर्थिक नुकसान होणार आहे. गावच्या विकासकामांना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सर्वानुमते भविष्यात कोणतीही अडचण किंवा अडथळा निर्माण होणार नाही, अशा अनुषंगाने ग्रामपंचायत कमिटीने नूतन ग्रामपंचायत सचिवालयाचे बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
मासिक सभा किंवा ग्रामसभेचा ठराव आवश्यक
सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जुन्या ग्रामपंचायतीचे निर्लेखन करून नूतन ग्रामसचिवालयासाठी मासिक सभेत ठराव करून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवून अंतिम मंजुरी घेतली आहे. तसेच आमच्या कार्यालयातील विस्तार अधिकारी यांनी या जागेची पाहणीदेखील केली आहे. यामध्ये कोणताही बदल करता येत नसल्याचे सांगून बांधकामास स्थगिती देण्यासाठी मासिक अथवा ग्रामसभेचा ठराव करणे गरजेचे असल्याचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी सांगितले.