कोल्हापूर :
महापालिका क्षेत्रात मोजक्या कंटेनरच्या माध्यमातून कचरा उठाव होत असून, त्यातील अनेक कंटेनर फुटलेले आहेत. त्यामुळे शहरभर दुर्गंधी पसरली आहे, तसेच डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार फोफावत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वावरण्याने लहान मुलांना धोका उद्भवत आहे. त्यामुळे योग्य उपाययोजनांसह फुटके कंटेनर बदलावेत या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाने प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांना दिले.
वेळेत कचरा उठाव होण्यासाठी टिप्परचे नियोजन करावे. फुटक्या कंटेनरच्या जागी सुस्थितीत असलेले कंटेनर बसवावेत. काही मोठ्या खाजगी दवाखान्यांच्या बाहेर असलेल्या कंटेनरमधून कचरा उलटून वाहत असतो. टिप्परद्वारे कचरा उठाव करताना डम्पिंग साइट लांब असल्याने एका गाडीला दिवसभरात फक्त 3 फेऱ्या करता येतात. यामुळे वेळ आणि इंधन वाया जाते. म्हणून टिप्परच्या फेऱ्यांची संख्या वाढण्यासाठी ‘ट्रान्सफर स्टेशन’द्वारे घनकचरा व्यवस्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा. या ट्रान्सफर स्टेशनच्या माध्यमातून शहरात विकेंद्रित पद्धतीने कचऱ्याचे नियोजन करता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, गिरीश पाटील, विशाल वठारे, राज कोरगावकर, रविराज पाटील, विजय भोसले आदी उपस्थित होते.