कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे आणि तिरुपतीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आणि तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसचे सर्व जुने आयसीएफ कोच बदलून आता नवीन एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. उद्या, गुरुवारपासून प्रवासी या नवीन कोचमधून आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेणार आहेत.कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिरुपती-कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसमधून व्यवसाय, शिक्षण तसेच पर्यटनासाठी रोज हजारो प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करतात. मध्य रेल्वेने या रेल्वेला लावलेले जुने आणि पारंपरिक आयसीएफ कोच आता बदलले आहेत. तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक १७४१५/१७४१६) आज, दिनांक २४ जानेवारीपासून तिरुपतीहून आणि २७ जानेवारीपासून कोल्हापूरपासून तसेच कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर (ट्रेन क्रमांक १७४११/१७४१२) महालक्ष्मी एक्सप्रेसचे २३ कोच उद्या, गुरूवार, दि. २५ जानेवारी रोजी रात्रीपासून पारंपारिकऐवजी एलएचबी कोचसह धावणार आहेत. ही गाडी रोज कोल्हापूर येथून रात्री ८.५० वाजता सुटते. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उद्या गुरुवारी रात्री ७.३० वाजता हा विशेष समारंभ होत आहे.
लिफ्ट बिल्डचे उद्या उदघाटनयाशिवाय प्रवाशांसाठी विविध प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीच्या लिफ्ट बिल्डचे उदघाटन उद्या रात्री खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार आहे.
रेल्वेचे महाव्यवस्थापक उद्या कोल्हापुरातदरम्यान, अमृत योजनेतील रेल्वेस्थानक पुनर्विकास कामाची पाहणीसाठी उद्या, बुधवारी सकाळी ७.३० वाजता रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्यासोबत विभागीय व्यवस्थापक इंदुरानी दुबे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मिलिंद हिरवे, जनसंपर्क अधिकारी रामपाल बडबग्गा, रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी आदी उपस्थित राहणार आहेत.
हे आहे नव्या कोचचे वैशिष्ट्यवजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता तसेच स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावण्यात आल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या दोन्ही गाड्यांना मोठ्या प्रमाणात पर्यटक, भाविक आणि प्रवाशांचा प्रतिसाद आहे. गेल्या काही वर्षापासून या गाडीचे जुने कोच बदलून नवीन कोच बसवण्यात यावे अशी मागणी मध्य रेल्वेकडे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती.