आमदार आवाडेंनी केलेली विकासकामे सर्वश्रृत
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सत्ता असो वा नसो आमदार प्रकाश आवाडे हे शहराच्या विकासासाठी नेहमीच झटत आले आहेत. त्यांना एखाद्या कामाबाबत कांगावा करण्याची गरज नाही, परंतु महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे प्रत्युत्तर ताराराणी पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आले.
केंद्र व राज्य शासन दरबारी आमदार आवाडे यांचा संपर्क व शहराच्या विकासासाठीचा पाठपुरावा हा आता नव्याने सुरू झालेला नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून दूरदृष्टीने ते नेहमीच कार्यरत असतात. आयजीएम रुग्णालयाच्या निधीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे आमदार आवाडे यांनी पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर क्रीडा संकुलाची मूळ संकल्पनाही आवाडेंचीच आहे. तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्यापासून पाठपुरावा सुरू आहे. त्यावेळेपासूनचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत.
तरीही महाविकास आघाडीचे प्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अनावश्यक बाबींचा उल्लेख करून आमदार आवाडे यांच्यावर नाहक आरोप करीत आहेत. त्यांच्या अशा वर्तणुकीला ज्या-त्यावेळी उत्तर दिले जाईल. आवाडे आमदार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून झालेल्या कामाचे श्रेय ते घेणारच, त्यासाठी इतरांनी त्रास करून घेण्याची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनील पाटील, प्रकाश मोरे, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, बाळासाहेब कलागते, आदी उपस्थित होते.
चौकट
खासदारांनी पुरावे सादर करावेत
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून झालेले विकासकाम मीच केलो, असे सांगत आहेत. अशा किती कामांचा तुमच्याकडे पाठपुरावा केलेला पुरावा आहे. तो असेल, तर सादर करावा, असे आव्हान नाव न घेता खासदार धैर्यशील माने यांना देण्यात आले.