कणकवली : शहरातील जानवली नदी ते एस.एम.हायस्कूलपर्यंत उभारण्यात आलेल्या बॉक्सेलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे . त्याबाबतचा अहवाल ' आरसीसी कन्सल्टंट ' कंपनीने दिला आहे . हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुपूर्द केला . तसेच अहवालातील निष्कर्षानुसार बॉक्सेल ऐवजी उड्डाणपूल विस्तारित करण्याची मागणी केली .कणकवली शहरातील बॉक्सेलची भिंत जुलै महिन्यात कोसळली होती . त्यानंतर ३१ जुलै रोजी उड्डाणपूलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला होता . त्यामुळे कणकवलीकर संतप्त झाले होते. त्यानंतर प्रमोद जठार यांनी कणकवली नगरापंचायतमध्ये महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी , महामार्ग ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेतली .
यात या संपूर्ण कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निश्चित केले होते . त्यानुसार कोल्हापूरच्या आरसीसी कन्सल्टंट या कंपनीने शहरातील उड्डाणपूल आणि बॉक्सेलची तपासणी केली .
या तपासणीत बॉक्सेलचे संपूर्ण काम निकृष्ट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे . तर उड्डाणपुलाचा स्लॅब टाकताना त्या स्लॅबला पुरेसे सपोर्ट आहेत की नाही हे ठेकेदाराने पाहिले नाही . ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा स्लॅब कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरसीसी कन्सल्टंट कंपनीचा हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सुपूर्द केला .
त्याचबरोबर संपूर्ण बॉक्सेल काढून टाकून तेथे फ्लायओव्हर विस्तारित करण्याची मागणी केली . कणकवली शहरात उड्डाणपुलाची मागणी गडकरी यांनी मंजूर केली होती . त्यामुळे फ्लायओव्हर विस्तारीकरणाचीही मागणी ते पूर्ण करतील असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला आहे .