समीर देशपांडेकोल्हापूर : ३१ डिसेंबर २०२३. वर्षअखेरीचा दिवस. त्यात रविवार आलेला. सकाळी-सकाळी कागलात जनता दरबारात बसलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ‘मूड’ जरा चांगला होता. ‘मुन्ना’, ‘इम्रान’ इकडं या. त्यांनी हाक मारली. ‘शिवाजी’ला सांगा आणि सगळ्या खासदार, आमदारांना सायंकाळी ६ वाजता केडीसी बँकेत बोलवा. दोन तास काढून यायला सांगा. अतिमहत्त्वाचं काम आहे म्हणून सांगा. बाकी काय बोलू नका. जरा गरम वडा, भजी आणि मसाले दुधाची सोय करा. फोन गेले. आमदार, खासदारांना प्रश्न पडला. पालकमंत्र्यांनी का बोलावलंय. परंतु सगळ्यांनी यायचं मान्य केलं. ३१ डिसेंबर साजरा करायला परत घरात येता येणार असल्यानं कोणी नाही म्हणालं नाही.वेळ : सायंकाळी ६ वाजतास्थळ : केडीसी बँकबहुतांशी आमदार पावणेसहाच्या ठोक्यालाच बँकेत हजर होते. विनय कोरे आणि पी. एन. पाटील यांना वेळेत आल्याचे पाहून मुश्रीफही आनंदले. बैठक बसली. मुश्रीफ म्हणाले, वर्षभर आपण एकमेकांचा पंचनामा करत फिरतच असतोय. म्हटलं जरा ३१ डिसेंबर मिळून साजरा करू या. मी तुम्हाला १५ मिनिटे देणार आहे. प्रत्येकाने चार ओळींची कविता सादर करायची आहे. दोघा-तिघांनी मुश्रीफ साहेब हे काय आणि... अशी सुरुवात केली. तेव्हा मुश्रीफ म्हणाले, ८ जानेवारीला ‘नियोजन’ची बैठक आहे. मला आता नाही म्हणायचं नाही. अखेर सर्वांनी माना डोलावल्या आणि जो-तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला. मुश्रीफ यांनी क्रमवारी जाहीर केली आणि त्यानुसार चारोळ्या सादर होऊ लागल्या.
स्पोर्ट्स टी-शर्ट घालून आलेले ऋतुराज पाटील यांनी पहिली चारोळी सादर केली. ते म्हणाले,काकांच्या मार्गदर्शनाखाली माझा प्रवास सुरू आहे,‘दक्षिण’ दिग्विजयासाठीपुन्हा एकदा सज्ज आहे.मग राजूबाबा आवळेंचा नंबर आला. ते म्हणाले,आमच्या इथली लढतम्हणावी तशी सोपी नाही,‘नियोजना’तील निधीअभावीमोठी कुचंबणा होई.
शिक्षक आमदार जयंत आसगावकर म्हणाले,शिक्षकांचे सगळे प्रश्नकाही केल्या संपत नाहीत,पाच जिल्ह्यांत फिरतानावेळ काही पुरत नाही.जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार जयश्री जाधव यांचा नंबर आला. त्या म्हणाल्या,आण्णांच्या स्वप्नपूर्तीसाठी,मी झाले आमदारबंटी साहेबांच्या नेतृत्वाखालीकामगिरी केली दमदार.पांढरा धोट पोशाख परिधान केलेले पी. एन. पाटील खर्जाच्या आवाजात चारोळी म्हणू लागले.गांधी घराण्याच्या त्यागावर,भारत देश उभा आहे‘भोगावती’ जिंकून आलोयविधानसभेवर पुन्हा ‘क्लेम’ आहे.खाली बसताना पी. एन. यांनी सतेज पाटील यांच्याकडे एक कटाक्ष टाकला.मुश्रीफ म्हणाले, बंटी आता तुमचा नंबर. विरोधी पक्षाला वाव दिला नाही, असं व्हायला नको. म्हणून काँग्रेसच्या आमदारांना पहिल्यांदा संधी दिली. बॉबर जॅकेट घालून आलेले सतेज पाटील म्हणाले,
‘नियोजन’च्या निधीचावाढवा आमचा टक्का,स्वस्थ बसणार नाहीघेतल्याशिवाय ‘योग्य’ वाटा.
मुश्रीफ यांनी ‘बरं, बरं’ म्हणत राजेश पाटील यांना खूण केली.राजेश पाटील यांनी डोक्यावरील पांढऱ्या टोपीचं टोक नीट केलं. ते म्हणाले,
कोट्यवधीचा निधीआणला मी सरकारमधून,माझं राजकारण नाहीमुंबईत बसून
हा भाजपच्या शिवाजीराव पाटील यांना टोला होता, हे सगळ्यांच्या लक्षात आलं.
मग प्रकाश आबिटकर यांची वेळ आली. ते जरा नाराजीनेच आले होते, असे वाटत होते. ते म्हणाले,
बिद्रीत हरलो तरी हॅट् ट्रिक करणार‘अर्जुन’ला साेबत धनुष्य ताणणारमुश्रीफ मांडी हलवत गालातल्या गालात हसत होते.मुश्रीफ म्हणाले, हां सावकर सुरू करा. विनय कोरे म्हणाले,
दिल्लीसाठी माझं नावचर्चेत यायला लागलंय,पण देवेंद्रजींच्या नेतृत्वातमुंबईत मस्त चाललंय
मुश्रीफ, बंटी म्हणाले, ‘हां हे अगदी बरोबर आहे’. तिकडे धैर्यशील माने यांचाही चेहरा उजळला.
ताेपर्यंत संजय मंडलिक यांची जरा गडबड सुरू होती. त्यांनी सुरुवातच केली.इकडून तिकडं, तिकडून इकडंधावपळ जरा सुरू आहे,लोकसभेच्या निवडणुकीआधीधाकट्याचं लगीन आहे.पोलिस ग्राउंडवरच्या लग्नाला सगळ्यांनी या, असं म्हणून सगळ्यांना पत्रिका देऊन मंडलिक लगेच बाहेरच पडले.तोपर्यंत धैर्यशील माने यांनी आपलं जाकेट ठीक केलं. त्यांनी भाषणाच्या आवेशातच सुरुवात केली. मुश्रीफ म्हणाले, खासदार चारोळी म्हणायचीय...होय, होय म्हणत धैर्यशील माने म्हणाले,नुसता मी बोलत नाहीदाखवलीत कामं करून,जनता आहे पाठीशीखंबीर पाठिंबा वरून.
यानंतर, नंबर आला धनंजय महाडिक यांचा. ‘सियावर श्रीरामचंद्र की जय’ म्हणून त्यांनी आधी घोषणा दिली. मग चारोळी सुरू केली,
बास्केट ब्रिज, ई बसेसस्वप्ने होणार पूर्ण,विरोधकांच्या पोटदुखीवरउपाय ‘मोदी चूर्ण’
इकडे राजेश क्षीरसागर यांची दोन मोबाइलवर बोलत चुळबुळ सुरू होती. मुश्रीफ जरा वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे बघायला लागले. ते लक्षात आल्यावर क्षीरसागर म्हणाले, अहो, अयोध्येला माणसं नेणार आहे. जोडणी लावत होतो. त्यांनी जोडूनच चारोळी सुरू केली.
बघताय काय रांगानंकोट्यवधीचा निधी आणलाय,एकनाथ शिंदेंच्या या वाघानं
आता खुद्द हसन मुश्रीफ यांची वेळ आली. ते यावेळी गळ्यात मफलर अडकवून आले होते. तो सरळ करत मुश्रीफ म्हणाले,
पालकमंत्रिपद मिळाले,झाली स्वप्नपूर्ती,विकासकामांसाठी माझीनेहमीच असते ग्वाही.निर्धार केलाय पक्काजनता जनार्दन पाहीमोदींना पंतप्रधान केल्याशिवायस्वस्थ बसणार नाही.
हे ऐकल्या-ऐकल्या महाडिक, मंडलिक, माने यांनी जोरात टाळ्या वाजवल्या, तर ‘साहेब येतो’ म्हणत बंटी पाटील बाहेरच पडू लागले, पण मुश्रीफ यांनी त्यांना खाली बसविले. एवढ्यात गरम वडे, कांदाभजी, मिरची भजी आली. मसाला दूध आले आणि हशा, टाळ्या देत सगळ्याचा ‘फन्ना’ उडवून नेते आपापल्या घरी रवाना झाले.
(न झालेल्या मंत्री, खासदार, आमदारांच्या काव्यमैफलीचे वृत्तांकन)