कोल्हापूर : एकीकडे पेठवडगावची महिला कोरोना पाझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असतानाच कोल्हापूर शहरातील एक ३९ वर्षांचा पुरूष कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ही माहिती मिळताच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रात्री ११ वाजता सीपीआरकडे धाव घेतली. तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा व वैद्यकीय सेवा खडबडून जागी झाली असून,सर्वांसमोर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यत शांत असलेल्या कोल्हापूर शहरात अखेर गुरुवारी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सर्वच यंत्रणा आणखी गतीने कामाला लागली आहे.पुण्याहून ही व्यक्ती २० मार्च रोजी कोल्हापुरात आली आहे. त्यानंतर तिला बुधवार दि. २५ मार्च रोजी ताप आला व घशात खवखव जाणवू लागली. त्यामुळे सीपीआरमध्ये या व्यक्तिची तपासणी करून घेण्यात आली. तसेच दाखलही करून घेण्यात आले. दरम्यान गुरूवारी रात्री ही या व्यक्तिचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकाच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हा अहवाल पाझिटिव्ह आल्याची माहिती कळताच सीपीआरमध्ये खळबळ उडाली. तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना देण्यात आली. त्यानंतर डॉ. गजभिये यांनी ही माहिती तातडीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली.आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना ही माहिती मिळताच ते तातडीने रात्री उशिरा सीपीआरमध्ये आले. त्यांनी डा. गजभिये यांच्यासह उपस्थित डाक्टरांशी चर्चा केली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारील सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 11 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 कोरोना रुग्ण निश्चित झाले आहेत, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातही रुग्ण आहे. स्वतंत्रपणे उपचारया व्यक्तिचा अहवाल पाझिटिव्ह आल्यामुळे त्या व्यक्तिवर स्वतंत्र इमारतीत आणि खोलीत उपचार करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिने आयसोलेशन हास्पिटलची तयारीही करण्यात आली आहे. मात्र कुठे उपचार करायचे याबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता.