कोल्हापूर : नागरिकांनी यापुढे आॅनलाईन फसवणुकीची तक्रार थेट सायबर पोलीस ठाण्याकडे द्यावी, असे आवाहन निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे.
मोबाईल एसएमएस, ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर, आदी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून जिल्ह्यात आॅनलाईन फसवणूक, समाजात जातीय तेढ निर्माण करणारे संदेश, आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. जी. एस. टी. करप्रणालीमुळे बरेचसे व्यवहार इंटरनेट बँकिंगद्वारे, आॅनलाईन झाले आहेत. अशा व्यवहारांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू केले आहे. या ठिकाणी सायबर लॅब, विविध तांत्रिक साधनसामग्री व सॉफ्टवेअर्सद्वारे सायबर गुन्ह्यांची उकल केली जात आहे.सोशल मीडियामधून वेगवेगळे संदेश पाठवून समाजात तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न केले जात आहेत. काही अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे समाजात असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर झटपट पैसा मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक सुशिक्षित लोक टीव्ही, वृत्तपत्रांतील बोगस जाहिरातींच्या आमिषाला बळी पडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
जी. एस. टी. करप्रणालीमुळे बरेचसे व्यवहार इंटरनेट बँकिंगद्वारे, आॅनलाईन झाले आहेत. अशा व्यवहारांमध्ये गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे. ते वेळीच रोखण्यासाठी सायबर गुन्हेगारीवर प्रतिबंध करण्याचे काम सायबर पोलीस ठाण्याद्वारे केले जात आहे.
सायबर गुन्हेगारांना शिक्षा लागण्यासाठी सर्व तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी विशेष प्रशिक्षित पोलीस अधिकारी व सहकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सामान्य नागरिकांची इंटरनेट बँकिंगद्वारे होणारी फसवणूक, फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर, मोबाईल व इतर माध्यमांतून होणारी महिला, युवतींची बदनामी व ब्लॅकमेलिंग, माध्यमांद्वारे होणाऱ्या तक्रारी दाखल करून त्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांना अटक करण्याचे काम सायबर पोलीस ठाणे करीत आहे. त्यासाठी नागरिकांनी थेट तक्रारी सायबर विभागाकडे द्याव्यात. जेणेकरून सामान्य नागरिकांचे सायबर गुन्हेगारीबाबतचे अज्ञान दूर होऊन पोलीस व नागरिक यांच्यात विश्वासार्हता वाढीस लागेल.नागरिकांना दक्षता घ्यावीदूरध्वनीवरून तुमच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करायची आहे, असे सांगून विचारलेल्या कोणत्याही बँकेविषयी माहिती, पिन नंबर, ओटीपी नंबर, सीव्हीव्ही नंबर, क्रेडिट, डेबिट कार्डवरील पासवर्ड नंबर अनोळखी व्यक्तीला देऊ नये. आॅनलाईन लॉटरी, नोकरीच्या भूलथापांना बळी पडून आॅनलाईन व्यवहार करू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या ई-मेल, फेसबुक रिक्वेस्ट, लिंक क्लिक, स्वीकारू नये.
मोबाईल, फेसबुक, ई-मेलचा काही लोक गैरफायदा घेऊ लागल्याने आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र ‘सायबर पोलीस ठाणे’ हा विभाग सुरू केला आहे. नागरिकांनी यापुढे थेट पोलीस मुखालयातील सायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार करावी,डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक