कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या तीन बनावट धनादेशांच्या माध्यमातून ५७ कोटींची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीची मंगळवारी बैठक होऊन त्यामध्ये अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल आता आज बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना सादर करण्यात येणार आहे. चौकशी समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी ही माहिती दिली.कोषागार अधिकारी अश्विनी नराजे, स्थानिक निधी व लेखा विभागाचे सुशीलकुमार केंबळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे हे या चौकशी समितीचे सदस्य असून पाणी व स्वच्छता विभाग, जलजीवनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट या समितीच्या सदस्य सचिव आहेत. गेल्या चार दिवसांत कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी वित्त विभागातील धनादेश, त्यांच्या सुरक्षेची उपाययोजना, तांत्रिक माहिती याबाबत चौकशी करून काही जणांचे जबाब घेतले होते. यावर सोमवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याची मांडणी करण्यात आली. त्यानुसार अहवाल तयार करण्यात आला असून, तो आज सादर करण्यात येणार आहे.या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतल्याचीही दखल घेण्यात आली असून, त्यांच्यामुळे जिल्हा परिषदेचा १८ कोटी रुपयांचा निधी सजगपणामुळेच परत मिळाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. एकूणच या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेचा फारसा दोष नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.
Kolhapur: ५७ कोटींच्या बनावट धनादेशप्रकरणी आज अहवाल सादर करण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:20 IST