कोल्हापूर : महापालिका हद्दवाढीच्या अभिप्रायासह अहवाल आज, मंगळवारी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत या संदर्भात सोमवारी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी काही सूचना केल्या व आज, मंगळवारीच हा अभिप्राय पाठविण्याचा निर्णय झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.शहरालगतच्या शिरोली व गोकुळ शिरगाव एमआयडीसींसह १७ गावांचा हद्दवाढीसाठी प्रस्ताव महापालिकेने यापूर्वी शासनाकडे पाठविला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह अहवाल पाठविला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हद्दवाढ कृती समितीने हा अहवाल सकारात्मक पाठवावा, अशा पद्धतीने निवेदन दिले होते. त्यावेळी काही दिवसांत हा अहवाल पाठविला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले होते; परंतु अद्यापही हा अहवाल पाठविण्यात आला नव्हता. हा अहवाल आज-उद्या यामध्येच अडकला होता. त्याबाबत सोमवारी दुपारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.हद्दवाढीसंदर्भात अभिप्राय पाठविण्यापूर्वी पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांनी आजच्या आज म्हणजे मंगळवारी अभिप्रायासह हा अहवाल मुंबईत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवावेत, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर या अहवालासोबत महापालिका आयुक्तांनी सध्याची शहराच्या लोकसंख्येची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, असेही सांगितले. त्यानुसार आयुक्त हे जिल्हाधिकाऱ्यांना लोकसंख्येची माहिती देणार आहेत. राज्य शासनाला पाठविलेल्या हद्दवाढीच्या अहवालामध्ये २०११च्या जनगणनेनुसारच्या लोकसंख्येची माहिती आहे. त्यानंतर पाच वर्षांत लोकसंख्या वाढली असल्याने ही माहिती महत्त्वाची असल्याने ती देण्याची सूचना केली आहे.हद्दवाढीसंदर्भातील अभिप्रायासह अहवाल आज शासनाकडे पाठविला जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आवश्यकता वाटल्यास संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हद्दवाढीच्या अभिप्रायासह अहवाल आज पाठविणार
By admin | Published: February 16, 2016 12:40 AM