कोल्हापूर : गंभीर अवस्थेतील रुग्ण महंमद स्वार (वय ७८) यांना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातू तहजीब पठाण (रा. लाईन बझार) यांनी केला आहे. मात्र, सीपीआरच्या डॉक्टरांनी या आरोपाचे खंडन केले आहे.
पठाण यांनी सांगितले की स्वार हे १० एप्रिलपासून सीपीआरच्या मानसोपचार विभागामध्ये दाखल आहेत. त्यांना कोरोनाही झाला आहे. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यांची तब्येत आणखी खालावल्याने अतिदक्षता विभागामध्ये त्यांना नेण्यास सांगण्यात आले. मात्र, तेथे बेड न मिळाल्याने त्यांना पुन्हा पहिल्या विभागात आणताना त्यांचा मृत्यू झाला.
मात्र, या आरोपाचा सीपीआरमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. पवन खोत यांनी इन्कार केला. रुग्णाची परिस्थिती गंभीरच होती. म्युकरमायकोसिसचा नवीन विभाग सुरू करण्यासाठी येथील रूग्ण हलविले जात होते; परंतु ऐनवेळी त्या ठिकाणी अतिगंभीर रुग्ण आल्यामुळे स्वार यांना पुन्हा मानसोपचार विभागात आणण्यात आले. त्यांना पुन्हा विभागात आणल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.