कोल्हापूर : दीड वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक अनंत गडदे यांच्या चौकशीचा अहवालच गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग आणि संबंधित पंचायत समिती एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. अखेर या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गडदे यांनी कुदनुर येथे सेवा बजावताना केलेल्या गैरकारभाराबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार भुदरगड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामण्णा यांनी चौकशी केली होती. गडदे यांची सध्या विभागीय खातेनिहाय चौकशीही सुरू आहे. अशातच तक्रारदार चंद्रकांत कांबळे यांनी रामण्णा यांनी दिलेल्या चौकशी अहवालाची प्रत लेखी पत्राद्वारे मागितली होती.मात्र, रामण्णा यांचा अहवाल जिल्हा परिषदेतही सापडत नसून चंदगड पंचायत समितीमध्ये तो मिळत नसल्याने तसे लेखी पत्र कांबळे यांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, दि. २२ मार्चला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी तालुका पातळीवरून हा अहवाल मिळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.अशातच तो अहवाल मिळेल याची खात्री नसल्याने ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी हातकणंगलेचे प्रभारी गटविकास अधिकारी आर. जी. पाटील आणि आजरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. डी. माळी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गडदे यांची याच प्रकरणातून शिरोळ तालुक्यात बदली झाल्याचे सांगण्यात आले.