कोल्हापूर : संस्कृतिसंवर्धन व ज्ञानदानाचा वसा अखंडपणे ८५ वर्षे जोपासणाऱ्या महाद्वार रोडवरील महाराष्ट्र ग्रंंथ भांडारतर्फे प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेल्या आपले महाभारत या गाजलेल्या १० खंडांतील ग्रंथांसह जुन्या पुस्तकांचेही पुनर्मुद्रण करण्यात येणार आहे. आपले महाभारत ग्रंथाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांनी रेखाटलेले आहे.भांडारच्या गाजलेल्या पुस्तकांच्या पुनर्मुद्रणाबरोबरच सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांसाठी २० टक्के सवलत जाहीर केली आहे. १९ पासून २८ फेब्रुवारीपर्यंत ही सवलत मिळणार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनापलीकडे जाऊन एका विचाराने ज्ञानप्रसारासाठी काम करणाऱ्या ग्रंथभांडारामध्ये आचार्य भागवत, आचार्य जावडेकर, आचार्य शंकरराव देव, विद्यापीठ हायस्कूलचे दीक्षित गुरुजी, इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव, प्रा. डॉ. ल. रा. नसिराबादकर अशा मान्यवरांची वर्दळ असे.
कोणताही धर्मग्रंथ, सर्वोदयी विचारांची पुस्तके, किंमत कमी व विक्रेत्यास मानधन अत्यल्प असणाऱ्या व्रतवैकल्यांच्या पुस्तकांसाठी ग्रंथभांडारकडे सामान्यांची पावले वळत. दादा कुलकर्णी यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव शशिकांत कुलकर्णी यांनी ही ओळख जपली. आता त्यांचे नातू निखिल व ऋतुपर्ण यांच्या साथीने सून नीलांबरी कुलकर्णी हा वारसा पुढे नेत आहेत.