संदीप बावचे
जयसिंगपूर : ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला असून, ग्रामपंचायतींच्या या निकालावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची भिस्त राहणार आहे.
राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडीचे एकत्रीकरण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विस्कटले असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी गायब झाली असून, स्थानिक गटातटाच्या आतापर्यंतच्या राजकारणानुसार या निवडणुका होत आहेत.
निकालानंतर सत्तेसाठी महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढतींमुळे उमेदवारासह नेतेमंडळींचा कस लागला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे, मुंबईसह देशभरातून आलेल्यांवर सर्वांच्या नजरा होत्या. त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी काही ठिकाणी वाटदेखील पाहावयास मिळाली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आता चित्र उलट पाहावयास मिळत असून, बाहेरील मतदारांना गावात कसे आणता येईल, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.
...........
ग्रामपंचायत निकालावर झेडचीची भिस्त
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारीदेखील आतापासूनच सुरू झाली आहे. अनेक जणांनी आरक्षण गृहीत धरून फिल्डिंग लावली आहे. अशा मंडळींकडून आघाडीचे नेतृत्व केले जात आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीवरच भविष्यातील राजकीय गणिते महत्त्वाची समजली जात आहेत.
वर्चस्वाला कडवे आव्हान
ग्रामपंचायतीची ही निवडणूक तरुणांनी आपल्या हाती घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या २० ते २५ वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या हातात ठेवणाऱ्या अनेक प्रस्थापितांसमोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे.