मलकापूर : जंगलातून मानवी वस्तीकडे आलेल्या व पळून दमछाक झालेल्या रानगव्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी औषधोपचार करून जीवदान दिले आहे. मंगळवार, ६ एप्रिल रोजी मलकापूर शहराजवळील कोपर्ड गावच्या शिवारात गवे नागरिकांना दिसले होते. यामध्ये तीन गवे होते. नागरिकांनी गव्यांना हुसकावण्यासाठी आरडाओरडा केला असता गवे कडवी नदीतून पेरीड गावच्या शिवारात गेले. त्यातील एक गवा पळता पळता पेरीड गावच्या शिवारात पडला होता. त्याला उठता येत नव्हते वन कर्मचाऱ्यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन टॅक्टरमध्ये नेऊन जंगलाशेजारी सोडले. तेथे त्याच्यावर अग्निशामक बंबाद्वारे पाण्याचा फवारा मारून त्याला शांत केले. पशुवैधकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांना बोलावून त्याला सलाईन चढविण्यात आले. गव्याच्या रक्षणासाठी मलकापूर वन विभागाचे पाच कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत आहेत. गेले तीन दिवस जंगली गव्यावर उपचार सुरू आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गव्यावर केलेल्या उपचारामुळे गव्याला जीवदान मिळाले आहे. पेरीड ग्रामस्थांनी मोलाची मदत केली असल्याचे नंदकुमार नलवडे यांनी सांगितले. यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे, वनपाल संजय कांबळे, राजाराम राजिगरे, वनरक्षक जालंदर कांबळे, किरण खोत यांनी परिश्रम घेतले.
फोटो
जंगलातून बिथरलेल्या गव्याला वन कर्मचाऱ्यांनी सलाइन लावल्यानंतर उभे असलेले वन कर्मचारी.